सर्व विधानसभा मतदारसंघातील माध्यम कक्षाचे कामकाज सुरळीत सुरू

                           

     ठाणे,(जिमाका):- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील कामकाज समन्वयाने पार पाडण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी सज्ज झाले आहेत. 18 विधानसभा मतदारसंघात माध्यम कक्ष स्थापन करण्यात आले असून या माध्यम कक्षांशी समन्वय साधण्यासाठी ‘एकत्रित माध्यम व प्रमाणीकरण कक्ष’हा जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यान्वित करण्यात आला आहे.

     जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांच्या सूचनेनुसार ‘एकत्रित माध्यम व प्रमाणीकरण कक्ष’स्थापन करण्यात आला असून जिल्हा माहिती अधिकारी तथा नोडल अधिकारी, एकत्रित माध्यम कक्ष व माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीचे सदस्य सचिव मनोज शिवाजी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षाचे काम सुरळीत सुरू आहे.

     माध्यम कक्षाच्या माध्यमातून दैनंदिन वर्तमानपत्रात येणारी संबंधित विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात आलेल्या बातम्यांच्या कात्रणांची दैनंदिन फाईल करणे, स्वीपच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या जनजागृतीपर वृत्त तयार करुन ते प्रसारमाध्यमांना पाठविणे, संशयित पेड न्यूजवर लक्ष ठेवण्याचे तसेच संशयित पेड न्यूज निदर्शनास आल्यास त्या प्रमाणिकरण करण्याचे कामकाज ‘एकत्रित माध्यम व प्रमाणीकरण कक्ष’हा जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे.

     स्थानिक पातळीवर प्रकाशित होणाऱ्या निवडणुकांविषयीच्या बातम्यांवर लक्ष ठेवणे. नामनिर्देशन अर्ज सादर करावयास येणाऱ्या उमेदवारांचे छायाचित्र, व्हिडीओ व माहिती प्रसारमाध्यमांना वेळेत उपलब्ध करून देणे, प्रत्येक विधानसभा मतदारसंघ राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची बातमी/ माहिती तसेच फोटो व व्हिडिओ तयार करण्यात येत आहेत. सर्व जिल्हा स्तरीय व स्थानिक प्रसारमाध्यमांबरोबर समन्वय साधणे. निवडणूक संबधीत अहवालांसाठी 18 विधानसभा मतदारसंघाची माहिती एकत्रित करून सादरीकरण, निवडणूक प्रक्रिया व निवडणूक यंत्रणा आदीबाबत नकारात्मक, दिशाभूल करणारी बातमी प्रसारित होत असल्यास तात्काळ जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहे.

     सोशल मीडियाचे सनियंत्रण, फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आदी समाज माध्यमांवरील निवडणूक प्रचार, आक्षेपार्ह पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व विधानसभा मतदारसंघातील नोडल अधिकारी, जनसंपर्क अधिकारी व माध्यम कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयाने ठाणे जिल्ह्यातील निवडणूकीचे कामकाज करण्यात येत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत