भविष्य निधी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या समस्या राजन विचारे यांनी आयुक्तांकडे मांडल्या
प्रतिनिधी - ठाण्यातील वागळे इस्टेट एमआयडीसी इमारतीतील भविष्य निधी कार्यालयात भविष्य निधी कर्मचारी संघटनांनी या संघटनेचे संरक्षक म्हणून निवड झाल्यानंतर कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ठाणे कार्यालयाच्या सचिव रेवती नाईक यांनी आमंत्रित केले होते. या कार्यक्रमासाठी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांचे जल्लोषात कर्मचाऱ्यांनी स्वागत करून आपल्या संघटनेच्या कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या राजन विचारे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. राजन विचारे यांनी कोणताही विलंब न लावता तात्काळ ठाणे उत्तर विभागाचे क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त नंदकुमार आडुळकर व दक्षिण विभागाचे क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त कुणाल ठाकूर यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. त्यावेळी त्यांना ठणकावून सांगितले की ठाणे व त्याच्या शेजारील इतर शहरातील नागरिकांना आपल्या नोकरीतील पी एफ मिळवण्यासाठी अपुऱ्या असणाऱ्या सुविधामुळे वारंवार हेलपाटे मारावे लागतात. पीएफ कार्यालयात जी पद्धत वापरली जाते ती अतिशय जुनी आणि कालबाह्य असल्याकारणाने संपूर्ण देशातल्या पीएफ कार्यालयात त्याचे परिणाम होत आहेत. तरी सुद्धा वरिष्ठ अधिकारी कामाचे टार्गेट देऊन सुट्टीच्याही दिवसाला काम करावयास लावत आहेत. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना सुविधा व्यवस्थित पुरवल्यास कर्मचारी आपली कामे चोख बजावू शकतात. या सिस्टिमचे आपण मॅनेजमेंट करत आहात जर सिस्टमच तुम्ही आधुनिक करत नसाल तर सिस्टम कशी काम करणार असा सवाल त्यांना केल्यानंतर त्यांच्या समस्या लवकरच निवारण करून देण्याचे आश्वासन आयुक्त यांनी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांना दिले आहे. त्यावेळी कार्याध्यक्ष अभय कुमार, उपाध्यक्ष नरेंद्र सिन्हा, सरचिटणीस विजय ठाकरे, क्षेत्रीय उपाध्यक्ष मनोज कुमार, व इतर कर्मचारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment