ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या फिरत्या विसर्जन व्यवस्थेचे आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते झाले लोकार्पण




*नौपाडा-कोपरी, माजिवडा-मानपाडा, वागळे आणि वतर्कनगर या चार प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये*


*विसर्जन व्यवस्थेचे वेळापत्रक ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर, 'पर्यावरणपूरक गणपती विसर्जन व्यवस्था २०२४' या शीषर्कावर उपलब्ध*

             


              ठाणे :ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी सहा फिरत्या विसर्जन व्यवस्थांची व्यवस्था करण्यात आली आहे. या महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या संकल्पनेतून ही व्यवस्था तयार झाली असून त्याचे लोकार्पण सौरभ राव यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. विसर्जनाची व्यवस्था असलेला हा ट्रक ठरलेल्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहे. त्या ट्रकवरील टाकीत गणेश मूर्तींचे विसर्जन करता येणार आहे. 


            कृत्रिम तलाव, टाकी व्यवस्था याप्रमाणेच महापालिकेने यंदा फिरत्या विसर्जन व्यवस्थेचा प्रयोग केला आहे. सध्या चार प्रभाग समितींमध्ये वेळापत्रकानुसार हे ट्रक फिरणार आहेत. गणेश भक्तांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त राव यांनी लोकार्पण प्रसंगी केले. 


यावेळी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपूरे, उपायुक्त मीनल पालांडे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी उपस्थित होते.


            महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात बांधकाम विभाग, पर्यावरण विभाग आणि घनकचरा विभाग यांनी विसर्जन व्यवस्थेचे नियोजन केले आहे. त्यात, ०९ विसर्जन घाट, १५ कृत्रिम तलाव, १० मूर्ती स्वीकृती केंद्र आणि ४९ ठिकाणी टाकी विसर्जन व्यवस्था आणि सहा फिरत्या विसर्जन व्यवस्था यांचा समावेश आहे.


           यावर्षी ही फिरती विसर्जन व्यवस्था नौपाडा-कोपरी, माजिवडा-मानपाडा, वागळे आणि वतर्कनगर या चार प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपलब्ध असेल. सकाळी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रभाग समितीमधील विविध ठिकाणी ठराविक काळासाठी हे फिरते वाहन विसर्जन व्यवस्थेसह उपलब्ध राहील. त्यावरील टाकीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करता येईल. या विसर्जन व्यवस्थेचे वेळापत्रक ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर, 'पर्यावरणपूरक गणपती विसर्जन व्यवस्था २०२४' या शीषर्कावर उपलब्ध उपलब्ध करण्यात आले आहे. , अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली. 


           *टाकी व्यवस्था ४९ ठिकाणी*


           गेल्यावर्षीपासून महापालिकेने कृत्रिम तलावांच्या सोबतीने छोट्या टाक्यांचीही व्यवस्था विसर्जनासाठी केली होती. त्यानुसार, गेल्यावर्षी ४२ ठिकाणी टाक्यांची सुविधा उपलब्ध होती. ती संख्या यंदा ४९ एवढी करण्यात आली आहे.


           *१० मूर्ती स्वीकृती केंद्रे*


              तसेच, जेल तलाव, मढवी हाऊस-राममारुती रोड, महागिरी कोळीवाडा, टेंभी नाका, रिजन्सी हाईट्स-आझादनगर, लोढा लक्झेरिया, कामगार हॉस्पिटल, किसन नगर बस स्टॉप, मॉडेला चेक नाका, देवदया नगर-शिवाई नगर या १० ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रे आहेत.


            *१५ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था*


             आंबेघोसाळे, मासुंदा दत्त घाट, खारीगाव, घोलाईनगर, दातिवली तलाव, खिडकाळी तलाव, न्यू शिवाजी नगर कळवा तलाव, निळकंठ वूड्स- टिकूजीनी वाडी, रेवाळे, बोरिवडे, ब्रम्हांड ऋतू पार्क, हिरानंदानी रायलादेवी-१, रायलादेवी-२,  उपवन तलाव परिसर-वर्तकनगर, देवदयानगर अशा १५ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.


            *०९ ठिकाणी विसर्जन घाट*


               त्याचबरोबर, कोपरी, पारसिक रेती बंदर,  रेतीबंदर -१, रेतीबंदर-२-राणानगर, फास्ट ट्रॅक ब्रिज, बाबाजी पाटील वाडी, शंकर मंदिर घाट, कोलशेत, बाळकूम अशा ०९ ठिकाणी विसर्जन घाटांची व्यवस्था आहे.


 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत