जरांगे - पाटील, आता जरा थांबा !
जेवणात ‘मीठ’ जास्त झाले की जेवण ‘बेचव’ होतं. सारखी सारखी ‘मिठाई’ खाल्ली की आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. वारंवार ‘उपोषण’ केल्याने ‘बातम्या’ होतील, गर्दी जमा होईल, सरकार कुसही बदलेल. परंतू जो ‘परफेक्ट इंम्पॅक्ट’ व्हायला पाहिजे तो होणार नाही.
जरांगेंचं 20 वर्षे ‘उपोषण’ सुरू आहे. ‘मराठा’ जागा झाला किंवा केलाही असेल. परंतू ‘मराठा आमदार’ किंवा ‘मराठा सत्ताधिश’ ओ.बी.सीं.च्याच प्रेमात पडले. ‘आम्ही गांवचे पाटील आहोत. आमचे साखर कारखाने आहेत. आमची 100 एकर बागाईत आहे. आम्ही ‘वाड्यावर या’च्या ऑर्डर सोडतो. आम्हाला कशाला हवे आरक्षण? या पलिकडे मराठा बोलला नाही असे गृहित धरले.
मनोज जरांगे-पाटील यांचा ‘त्याग’ आहे. ःत्यांची धडपड प्रामाणिक आहे. काल छत्रपती संभाजी महाराज म्हणाले, ‘खरे शाहु महाराजांचे ‘वारस’ मनोज जरांगे-पाटील आहेत” हा जो छत्रपती संभाजी महाराजांचा ‘मोठेपणा’ आहे. तो थोडा ‘संशयास्पद’ वाटतो. स्वतःचा ‘वारसा हक्क’ निवडणुकांमध्ये यश मिळावं म्हणून जरांगे-पाटलांच्या पदरात टाकायचा ही ‘अतिशयोक्ती’ वाटते. असो!
जरांगे-पाटील, तुमचे सल्लागार किंवा तुमच्या आजुबाजूला ‘राजकीय - सामाजिक अभ्यासक’ कोण आहेत हे माहित नाही. परंतू ‘व्यक्तीद्वेषा’तून आंदोलन पुढे सरकत असेल तर, ज्यांचा ‘खरोखरच द्वेष’ करायला पाहिजे होता, ते आता तुमचा ‘वापर’ करताहेत हे विसरू नका! कुणाची ‘तुतारी’ वाजविता?
चार वेळा राज्याचं ‘प्रमुखपद’ भुषवूनही मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं नाही. याचा विसर कसा पडतो? जेव्हा ‘मंडल कमिशन’च्या बोगस नोंदीवर ओ.बी.सीं.चे ‘उखळ पांढरे’ झाले, त्यावेळी मराठ्यांसाठी 13% आरक्षण शिल्लक होते. ‘इच्छाशक्ती’ असती तर याच ‘मराठा’ समाजाच्या पदरात ते टाकलं असतं. तसे केले नाही. उलट ओ.बी.सीं.ना‘मंडल’ने दिलेले 14% व बारामतीकरांनी त्यात भर म्हणून
टाकलेले 13%, असे 27% आरक्षण ओ.बी.सीं.ना मिळाले. एवढं होवूनही जरांगे-पाटील हे ‘तुतारी’च वाजवू इच्छितात?
ब्राह्मण असून देवेंद्र फडणविस यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून ‘प्रामाणिक प्रयत्न’ केलेला दिसला. त्यांनतर ‘घरातून सत्ता’ चालविणार्यांना ‘सुप्रीम कोर्टा’त जाण्यासाठी व तेथे लढण्यासाठी वेळच मिळाला नाही. मराठे ‘युद्धा’त जिंकले. मात्र ‘तहा’त हरले. पुढे ‘मराठा’ मुख्यमंत्री झाला. त्यांनी तर ‘विशेष अधिवेशन’ बोलावून 10% मराठ्यांना आरक्षण मंजूर केले. ‘कुणबी नोंदी’ शोधायला लावल्या. त्या ग्राह्य सुद्धा धरल्या.
म्हणजे शिंदे - फडाविस ‘मराठ्यांना आरक्षण मिळावे’ या बाजुचे आहेत हे कागदावर तरी दिसतात. या पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी ‘मराठा आरक्षणा’साठी ‘एक पाऊल’ टाकले होते, याचा ‘एक दस्त’ तरी दाखवा! म्हणजे ज्यांनी मराठ्यांना ‘वापरलं’ त्यांच्या तुतार्या वाजवायच्या. व जे प्रयत्न करतात त्यांच्या विरोधात वारंवार ‘उपोषण’ करायचे? ही मराठा आंदोलनाची भरकटलेली दिशा आहे असं माझं स्पष्ट मत आहे!
जरांगे-पाटील, ही उपोषणाची वेळ नाही तर ही वेळ ‘विधानसभेची तयारी’ करण्याची आहे. तुमचे आंदोलन वाशीपर्यंत धडकले तेव्हा तुमच्या ‘लोकप्रियतेचा ग्राफ’ नरेंद्र मोदींपेक्षा नव्हे ‘जो बायडेन’पेक्षा मोठा व उंच होता. खरी तीच वेळ होती. तुम्ही ‘आश्वासनांच्या रेवड्या’ गिळण्यात मग्न झाला. जिंकलो! जिंकलो!! ओरडत सुटले. तो विजय नव्हताच. विजय संसदेत ‘मराठा आरक्षण बिल मंजूर’ झाल्यानंतर साजरा करायचा होता. ते केलं नाही. आता सकाळी उपोषण, चार दिवसांनी प्रकृती खालावली, मंत्री भेटीला, समिती स्थापन, तारीख वाढवून देतो, भुजबळ, फडणविसांना शिव्या, 288 पाडतो, माझ्याशी गांठ आहे. म्हणत उपोषण समाप्त!
आरक्षण मिळविण्याचा हा मार्ग नाही. 48 जागा लोसकभेच्या होत्या. ‘48 मराठा’ लोकसभेला उभे केले असते आणि त्यांच्या गळ्यात ‘एक मराठा कोटी मराठा’चा फलक लटकवला असता व जरांगे-पाटील यांच्या 48 सभा महाराष्ट्रात झाल्या असत्या तर किमान ‘25 खासदार’ मराठ्यांचे संसदेत दिसले असते. तेच 25 खासदार मोदींना सोन्याच्या भावापेक्षा जास्त किंमतीचे वाटले असते. 13 चंद्राबाबू, 14 नितीशकुमार, 7 शिंदे, 5 पासवान अशी खारदार मंडळी मोदींशी
‘बार्गेनिंग’ करतात. मराठ्यांचे 25 असते तर ‘मराठा आरक्षणा’चा जी.आर. मोदींनी ‘आंतरवाली सराटीत’ आणून दिला असता. ते जमलं नाही. फसलेल्या आंदोलनाला ‘उपोषणाचा मुलामा’ वारंवार देऊ नका! ‘मराठा’ लेखक, पत्रकार, संपादक म्हणून कळकळीची विनंती आहे.
अजुनही वेळ गेलेली नाही. 288 उमेदवार विधानसभेसाठी उभे करा. ‘हा ‘मराठा’ उमेदवार नव्हे ‘मनोज जरांगे’ असं बिंबवा! तसे ठासून सांगा! मी एक मनोज जरांगे-पाटील नाही तर ‘288 मनोज जरांगे-पाटील’ आहेत असं महाराष्ट्राच्या 6 कोटी मराठ्यांना सांगा! युती नको, आघाडी नको, तिसरी फळी नको, असंगाशी संग नको, निळे, हिरवे, पांढरे, पिवळे झेंडे नको! एकच ‘शिवरायांचा भगवा’ त्या 288 उमेदवारांच्या गळ्यात टाका! 145 चा आकडा पार करण्याची हिंमत ठेवा! ‘मराठा आरक्षण’ तुमच्या दारात कुर्नीसात करू शकेल!
आत्मक्लेष, उपोषण ही आता चेष्टा झालीय! आण्णा हजारेंच्या समोर काही टाळकी ‘तंदूर बिर्याणी’ खाऊन उपोषण करत होती. हजारेंसह केजरीवालांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. परंतू करणार काय? केजरीवालने ‘ताव मारला’! त्याला दिल्ली मिळाली. हजारे आत्मक्लेष करत बसले. त्यांना ‘यादव बाबांचे मंदीर’ मिळाले. जरांगे-पाटील, आता जरा थांबा!
शब्दांकन - मधुकरराव मुळूक/9821540607

Post a Comment