शहराची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा, कचरा वेचक महिलांचा आदर करा – अभिनेत्री मधुराणी गोखले
स्वच्छता पंधरवड्यानिमित्त कोरम मॉलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन
ठाणे - सर्वत्र स्वच्छता पंधरवडा सुरू आहे, याच अनुषंगाने ठाणे महापालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. ठाणे बदलतंय..हे दृश्य स्वरूपात दिसू लागले असून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता दूत, सफाई कर्मचारी, कचरावेचक काम करीत आहेत. त्यांना मदत करणे ही आपली जबाबदारी असून कचरा वेचक महिलांचे काम कमी करण्यासाठी आपण आपल्या घरातील ‘ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा करूया,’ आपल्याला कधी या कचरा वेचक महिला, स्वच्छता दूत रस्त्यात भेटले तर आपण त्यांचा आदर करूया असे वक्तव्य ठाणे महापालिकेच्या स्वच्छता उपक्रमाच्या ब्रँड ॲम्बेसडर अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी केले.
१७ सप्टेंबर ते २ आक्टोंबर या कालावधीत देशपातळीवर स्वच्छता पंधरवडा सुरू आहे. याच अनुषंगाने ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून स्वच्छता सेवा २०२४ या सूत्रावर आधारित ठाण्यातील विविध संस्था एकत्र येऊन स्वच्छमेव जयते उत्सव स्वच्छतेचा २०२४ हा कार्यक्रम शनिवारी कोरम मॉल येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास खासदार नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनिष जोशी, जी.जी. गोदेपुरे, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, उप मुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, स्वच्छता निरीक्षक मुकेश नेसवणकर तसेच महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
स्वच्छ भारत अभियान या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला उत्सफूर्तपणे प्रतिसाद देवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता पंधरवडा साजरा होत आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातूनही शहरात विविध ठिकाणी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता हे अभियान सुरू आहे. या अभियानात प्रत्येक नागरिकांनी सहभागी होणे आवश्यक आहे, तसेच ‘मी माझा कचरा रस्त्यावर टाकणार नाही असा निश्चय जेव्हा आपण करु तेव्हाच खऱ्या अर्थाने आपले ठाणे शहर स्वच्छ होईल’ असे सांगत आपण सर्वांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेऊया असे आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी केले.
ठाणे महापालिकच्या या उपक्रमात उत्सव ठाणे च्या माध्यमातून एकत्र आलेल्या सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांनी मिळून ‘स्वच्छमेव जयते’ या विषयावर मनोरंजनातून प्रबोधनपर कार्यक्रम यावेळी सादर केले. समर्थ भारत व्यासपीठाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या कचरा पुनर्वापर प्रक्रियेत काम करणाऱ्या महिलांनी फॅशन शो च्या माध्यमातून शहर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. तसेच कचरा वेचक महिला, त्यांची मुले, सफाई कर्मचारी, सिग्नल शाळेचे विद्यार्थी यांनी फॅशन शो च्या माध्यमातून ओला कचरा, सुका कचरा वर्गी करण करण्याचा संदेश दिला.
त्याचप्रमाणे कलांकुर संस्थेचे गौरी व सौरव शर्मा यांनी कथ्थक नृत्यांच्या माध्यमतातून स्वच्छतेची ज्योत पेटवूया असा संदेश दिला. वर्षा ओगले व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारुड सादर करुन आपले शहर स्वच्छ ठेवण्याचा, ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरणाचा संदेश दिला. रस्ते स्वच्छ ठेवा, रस्त्यावर कचरा टाकू नका हे सांगणारे पथनाट्य यावेळी सादर करण्यात आले. टाकाऊ वस्तूंच्या वापरातून तयार केलेल्या वाद्यांच्या सहाय्याने स्वत्व ठाणे ड्रम सर्कल व इंडियन एज्युकेशन सोसायटीचे वास्तुशास्त्र महाविद्यालयाने 'कबाड बँड' ही अनोखी संकल्पना सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. तसेच 'आगाऊ पोरे' या स्टँड अप कॉमेडीचे कलाकार अथर्व हिंगणे यांच्या पुढाकाराने खास स्वच्छता या विषयावरील स्टॅड अप शो सादर करण्यात आला. या शो च्या माध्यमातून मनोरंजक पध्दतीने स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. कलाकुंर आर्टच्या ओमकार गजरे यांनी स्वभाव स्वच्छता .. संस्कार स्वच्छता ही नाटिका सादर केली.
ठाणे महापालिकेसमवेत 'स्वत्व ठाणे, ए.आर व्हेंचर्स, रोहन्स एरा, आगाऊ पोरे, कलांकुर, स्त्री मुक्ती संघटना, समर्थ भारत व्यासपीठ, काशी कला मंदिर, इंडियन एज्युकेशन सोसायटी वास्तुशास्त्र महाविद्यालय', श्री मॉ विद्यालय या संस्था सहभागी झाल्या होत्या. कोरम मॉलने व्हेन्यू पार्टनर म्हणून कार्यक्रम सादर करण्यासा जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल कोरम मॉलचे विकास लड्डा यांचे उपायुक्त मनिष जोशी यांनी आभार व्यक्त केले.

Post a Comment