'बोलता बोलता' अभ्यासून उत्तम निवेदक निर्माण होतील असा साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांचा विश्वास


निवेदन, सूत्रसंचालन क्षेत्रातील वैविध्य टिपणारे 'बोलता बोलता' हे महेंद्र कोंडे यांचे पुस्तक जणू 'यशस्वी निवेदनाचे पाठ्यपुस्तक' असून हे पुस्तक वाचून, अभ्यासून आणखी आठ-दहा वर्षांनी चांगल्या निवेदकांची फळी महाराष्ट्रात निर्माण झाली तर आश्चर्य वाटायला नको अशा शब्दात सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांनी या पुस्तकाचे महत्व सांगत शुभेच्छा दिल्या.

व्यास पब्लिकेशन हाऊस प्रकाशित 'बोलता बोलता' या निवेदक महेंद्र कोंडे लिखित पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी, गीतकार प्रा.प्रवीण दवणे यांच्या शुभहस्ते ठाणे येथे मोजक्या साहित्य रसिकांसह अतिशय आत्मिय वातावरणात संपन्न झाले. याप्रसंगी सौ. प्रज्ञा दवणे, लेखक - निवेदक महेंद्र कोंडे, व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड, व्यास पब्लिकेशन हाऊसच्या प्रकाशिका सौ. वैशाली गायकवाड, साहित्यिक विनोद पितळे, निवेदिका वेदश्री दवणे उपस्थित होते.

वाद्यवृंदांचे बैठकी निवेदन, उभ्याने निवेदन, विविध स्वरूपाच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, आकाशवाणी, दूरदर्शन, एफ एम वाहिन्या, ऑनलाइन कार्यक्रम यांचे निवेदन अशा नानाविध क्षेत्रांना स्पर्श करणाऱ्या या पुस्तकामधील सगळी प्रकरणे ओघवत्या निवेदनासारखी असून केवळ निवेदन, सूत्रसंचालनच नाही तर व्यासपीठावर कोणत्याही प्रकारची शब्द मुशाफिरी करू इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयोगी असल्याचे प्रवीण दवणे म्हणाले.

व्यास पब्लिकेशन हाऊस ही केवळ दिखाऊ आणि विकाऊ पुस्तके प्रकाशित करणारी संस्था नसून पुस्तकांतून विविधांगी मूल्य शिक्षण देणारी संस्था असल्याचे सांगत प्रवीण दवणे यांनी बोलता बोलता हे वेगळ्या आशयसूत्राचे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. बोलू इच्छिणाऱ्या प्रत्येकापर्यंत त्यातही विद्यार्थ्यांप्रमाणेच विशेषत्वाने सर्व शिक्षक, प्राध्यापकांपर्यंत हे अत्यंत उपयुक्त पुस्तक पोहोचले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

विविध ठिकाणच्या कार्यक्रमांतील सूत्रसंचालकांच्या अनेक गमतीजमतीही त्यांनी सांगितल्या. सूत्रसंचालक हे वक्त्यांना ‘भाषण आवरते घ्या’ म्हणून चिठ्ठ्या देतात. मात्र काही सूत्रसंचालक इतके बोलतात की त्यांना चिठ्ठी कोण देणार? असा प्रश्न पडतो. ‘हे पुस्तक म्हणजे निवेदक, सूत्रसंचालकांना दिलेली चिठ्ठी आहे’ अशी मिश्किल टिप्पणीही प्रवीण दवणे यांनी केली.

पं. हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते व अनेक नामांकित गायकांच्या कार्यक्रमांचे निवेदन केले असल्याने या लेखनाशी माझे सूर त्वरेने जुळले असे सांगत प्रवीण दवणे यांनी त्या निवेदनाच्या काळातील आठवणींचा खजिना खुला केला. गानसम्राज्ञी आशा भोसले यांनी "मला केवळ गोड आवाजाचा निवेदक नको तर मजकुराचा निवेदक पाहिजे" असे म्हणत प्रवीण दवणे यांनीच त्यांची मुलाखत घ्यावी असा धरलेला आग्रह सांगताना उत्स्फुर्तता हा निवेदकाचा सर्वात मोठा गुण असून त्यासाठी निवेदक पाठांतऱ्यापेक्षा सर्जनशील हवा असे मत मांडले.

ज्ञानसाधना महाविद्यालयात प्रवीण दवणेसर वर्गात बोलू लागले की प्राणांचे कान करून ऐकण्याच्या संस्कारातूनच सूत्रसंचालन, निवेदनाची बीजे खोलवर रुजली असावीत असे सांगत निवेदक, लेखक महेंद्र कोंडे यांनी प्रवीण दवणसरांचे अभ्यासपूर्ण प्रस्तावनारुपी शब्दाशीर्वाद या पुस्तकाला लाभणे हा भाग्ययोग असल्याचे म्हटले. वर्तमानपत्रातील सदरात पहिला लेख छापून आला त्याच दिवशी याचे आपण पुस्तक करूया हा शब्द खरा करणारे बालमित्र, व्यास क्रिएशन्सचे निलेश गायकवाड व त्यांच्या पत्नी व्यास पब्लिकेशन हाऊसच्या प्रकाशिका वैशाली गायकवाड यांचे त्यांनी विशेष आभार मानले.

याप्रसंगी निलेश गायकवाड, सौ. वैशाली गायकवाड व विनोद पितळे यांनी शब्द शुभेच्छा दिल्या. निवेदिका वेदश्री दवणे यांनी या कौटुंबिक स्वरूपातील पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे ओघवते  सूत्रसंचालन केले.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत