रिक्षाचालकाचा मुलगा बनला लेफ्टनंट

 




ठाणे : मेहनतीला योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली कि अशक्य काहीच नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रतीक पवार. वागळे इस्टेट ठाणे येथे राहणारा हा अत्यंत सामान्य घरातील मुलगा. लहानपणी शिवाजी होण्याचे स्वप्न बघणारा, पण दहावी - बारावीत चांगले गुण मिळाले की डॉक्टर/ अभियंता होण्यासाठी धडपडणारा. वडील रिक्षाचालक, आई गृहिणी. अभियंता बनण्याचे स्वप्न घेऊन, त्याने विद्या प्रसारक मंडळाच्या बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण याच दरम्यान तो महाविद्यालयाच्या एएससी ठाणे आर्मी बॉईज एनसीसी युनिट मध्ये दाखल झाला आणि आयुष्याची दिशाच बदलली.
एनसीसीच्या ट्रेनिंगने या सामान्य वाटणाऱ्या मुलात देशप्रेमाचे वारे भरले. या बदलाचे श्रेय तो एएससी ठाणेचे असोसिएट एनसीसी ऑफिसर कॅप्टन बिपीन धुमाळे यांना देतो.प्रतीक मधील जिद्द, मोठी स्वप्न बघण्याची  आणि त्यासाठी लागणारे कष्टही करण्याची तयारी ओळखून त्यांनी त्याला प्रोत्साहन दिले. तो इंजिीअरिंगचा विद्यार्थी असल्यामुळे, त्याच्या असाइनमेंट, प्रॅक्टिकल, सेमिस्टर यातच बराचसा वेळ जायचा. त्यामुळे  एकत्रित संरक्षण सेवा परीक्षांचा अभ्यास, ड्रिल प्रॅक्टिस यांसाठी वेळ काढणे कठीण जायचे. त्यामुळे ट्रेनिंग कॅम्प मधील रिक्त जागा, व्याख्यानांचं वेळापत्रक सगळेच संभाळून घ्यावे लागत होते. यासाठी एएससी ठाणे, बा. ना. बांदोडकर महाविद्यालय यांच्याबरोबरच एनसीसीचे कमान अधिकारी, मुंबई मुख्यालयाचे ग्रुप कमांडर, महाराष्ट्र राज्य निदेशक (एडीजी) यांनीही त्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले.
धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे!  या माधव ज्युलियन यांच्या काव्यपंक्तीचाही प्रतीकला व्यवस्थित प्रत्यय आला. एकीकडे एनसीसी ऑफिसर परीक्षा आणि मुलाखतींची तयारी करून घेत होते तर दुसरीकडे बा. ना. बांदोडकर महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी कॅप्टन कुणाल सिंघवी सुद्धा त्याच्या मदतीला धावून आला. कुणाल दोन वर्षांपूर्वीच एनसीसी कोट्यातून अधिकारी झाला होता. त्याचे अनुभवाचे बोलही प्रतीकच्या कामी आले. मेहनतीला मार्गदर्शनाची जोड मिळाली आणि एक स्वप्न साकार झाले.

अभियांत्रिकी शिक्षण, लहानमोठी कामे करत आईवडिलांच्या फाटक्या संसाराला ठिगळं लावणे आणि तरीही आर्मी ट्रेनिंगमध्ये सातत्य राखणं, अशी तारेवरची कसरत करत प्रतीक पवार भारतीय लष्करात लेफ़्टनंट पदावर पोहोचला. ऑफिसर ट्रेनिंग अकॅडेमी, चेन्नई मध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याची नुकतीच पास आउट परेड झाली. रिक्षाचालकाचा मुलगा लेफ़्टनंट बनला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत