कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित २४५ ग्राहकांच्या घरात परतला ‘प्रकाश’


महावितरण अभय योजनेतून मिळवली वीजजोडणीव्याजमाफीसह मूळ थकबाकीत सवलत

 





 

कल्याण/वसई/पालघर:वीजबिल थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित केलेल्या कल्याण परिमंडलातील २४५ ग्राहकांची घरे प्रकाशाने पुन्हा उजळली आहेत. या ग्राहकांनी व्याज व विलंब आकार शंभर टक्के माफीसह किमान ३० टक्के थकबाकी भरणाऱ्यांना त्वरित वीजजोडणीची संधी देणाऱ्या महावितरण अभय योजना-२०२४ चा लाभ घेत ही संधी साधली. १ सप्टेबरपासून या योजनेची सुरुवात झाली असून परिमंडलातील २ लाख ९४ हजार ९१ घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना कायमस्वरुपी खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याची संधी यातून मिळणार आहे. परिमंडलातील ३८९ ग्राहकांनी आत्तापर्यंत या योजनेचा लाभ घेतला असून उर्वरित ग्राहकांनीही योजनेत सहभागी होण्याचे आवाहन मुख्य अभियंता चंद्रमणि मिश्रा यांनी केले आहे.    

अभय योजनेनुसार मार्च-२०२४ अखेर किंवा तत्पूर्वी वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित झालेले लघुदाब व उच्चदाब ग्राहक (सार्वजनिक पाणीपुरवठा व कृषीपंप ग्राहक वगळून) योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. थकबाकीची मुळ रक्कम एकरकमी किंवा सहा समान हप्त्यात भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पुर्णतः माफ़ होईल. योजनेतील सहभागी ग्राहकांना एकरकमी किंवा सहा समान हप्त्यात मूळ थकबाकी भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तर थकबाकी एकरकमी भरणाऱ्या उच्चदाब ग्राहकांना मूळ थकबाकीवर ५ टक्के आणि लघुदाब ग्राहकांना १० टक्के अतिरिक्त सवलत मिळणार आहे. मूळ थकबाकी एकरकमी अथवा ३० टक्के रक्कम भरुन योजनेत सहभागी होता येईल. त्यानंतर मागणीप्रमाणे आवश्यकतेनुसार तत्काळ नवीन वीजजोडणी मिळेल. ३० टक्के रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना मूळ थकबाकी व्याजमुक्त अशा सहा समान हप्त्यात भरण्याची सवलत उपलब्ध आहे.

कल्याण परिमंलातील २ लाख ९४ हजार ९१ ग्राहक या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. योजनेत सहभाग घेत या ग्राहकांना विलंब आकाराचे ३ कोटी ८१ लाख व व्याजाचे ४० कोटी ६१ लाख रुपयांची सवलत मिळवण्याची संधी आहे. त्यासाठी पात्र ग्राहकांनी https://wss.mahadiscom.in/wss/wss या पोर्टलवर केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. याशिवाय महावितरणच्या स्थानिक कार्यालयांमध्ये इच्छुक ग्राहकांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित झालेल्या संबंधित ग्राहकांनी अधिकाधिक संख्येने या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

 

  

मंडल कार्यालय

पात्र ग्राहक

मूळ थकबाकी

विलंब आकार

व्याज

कल्याण- एक

३८,२१२

३३.८२ कोटी

४२.८१ लाख

३.७८ कोटी

कल्याण- दोन

८८,१०२

९५.२५ कोटी

१.२१ कोटी

१८.४८ कोटी

वसई

१,०३,३०३

१०३.७६ कोटी

१.३१ कोटी

९.७६ कोटी

पालघर

६४,४७४

६८.३५ कोटी

८६.५२ लाख

८.५८ कोटी

कल्याण परिमंडल

२,९४,०९१

३०१.१८ कोटी

३.८१ कोटी

४०.६१ कोटी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत