जिल्हा रुग्णालयात डायलिसिस प्रक्रिया सुसाट

 

सहा महिन्यात १००० सेशन घेऊन दिले रुग्णांना जीवनदान

ठाणे, प्रतिनिधी 



डायलिसिस खर्चिक आणि किचकट उपचार प्रक्रिया आहे. त्यासाठी मोठा खर्च येतो. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात मात्र ही प्रक्रिया अत्याधुनिक यंत्रांद्वारे मोफत पार पाडली जात आहे. अवघ्या सहा महिन्याच्या काळात या रुग्णालयाने विविध रुग्णांवर तब्बल १००० वेळा डायलिसिस करून त्यांना जीवनदान दिले आहे. येथील डायलिसिस सेंटरमध्ये १४ यंत्र बसवले असून त्यांच्या माध्यमातून रुग्णांचे रक्त शुद्ध करण्याचे काम केले जात आहे.


रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकण्याचे नैसर्गिक काम किडनी मार्फत होत असल्याने किडनी खूप महत्वाचे कार्य आहे. मात्र काही शारीरिक व्याधिमुळे किडनीची काम करण्याची प्रक्रिया मंदावते. परिणामी रक्तामधील नकोस असलेल्या घटक नैसर्गिकरीत्या शरीराबाहेर फेकले जात नाहीत. अशावेळी सबंधित रुग्णाला डायलिसिस उपचाराची गरज भासते. या उपचारात शरीरातील सर्व रक्त यंत्राद्वारे बाहेर काढून त्यामधील अनावश्यक विषारी घटक वेगळे करून शुध्द झालेले रक्त पुन्हा त्या रुग्णाच्या शरीरात सोडले जाते. ही प्रक्रिया अत्यंत जोखमीची, गुंतागुंतीची आणि खर्चिक असल्याने गरिबांना ही उपचार पद्धती मिळणे अत्यंत कठीण जाते. मात्र ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात हे उपचार मोफत मिळत असून त्याचा गरीब आणि गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले आहे. जिल्हा रुग्णालयात गेल्या सहा महिन्यात रुग्णांवर १००० हून अधिक वेळा रक्त शुद्ध करण्याचे काम करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष तयार केला आहे. सुसज्ज  असणाऱ्या डायलिसिस सेंटरमध्ये दर दिवशी रुग्णांवर उपचार होत आहेत. गेल्या सहा महिन्यात एक हजार डायलिसिस सेशन झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली. जिल्हा रुग्णालयातील अत्याधुनिक डायलिसिस सेंटरमध्ये एकूण १४ यंत्र असून, त्यांच्यामाध्यामातून रक्त शुद्ध करण्याचे काम केले जाते. हा उपचार घेण्यासाठी गरजू रुग्णांची संख्या वाढत आहे. डायलिसस वैद्यकीय अधिकारी डॉ. संचिता मुळीक, डॉ. विद्या कदम, इंदिरा गावित, वंदना शिंदे आदींवर या विभागाची जबाबदारी आहे.


किडनी जेव्हा रक्त शुद्धीकरणाचे काम थांबवते त्यावेळी डायलिसिसची आवश्यकता भासते. असे गरजू रुग्ण मोठ्या प्रमाणात जिल्हा रुग्णालयात येत आहेत. सध्या दोन सत्रात हे काम केले जाते, गरज पडल्यास आणखी सत्र वाढविण्याची आमची तयारी आहे. आमच्याकडे आलेला एकही रुग्ण उपचाराविना माघारी जाता कामा नये. इतर रुग्णालयात उपचार घेतले असतील तर ते कागदपत्र आणि आधार कार्ड सोबत आणले तरी येथे त्वरित मोफतपणे डायलिसिस केल्या जाते. अशा रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.

- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत