जनकल्याण स्मार्ट कार्ड चे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने हजारो महिलांना वाटप..


 


* आ.संजय केळकर यांची महिला भगिनींसाठी अनोखी भेट..


* महिला विकास परिवार संस्थेचे संयोजन


सरकारच्या विविध शासकिय योजनांमधून महिलांच्या सक्षमीकरणाचे कार्य होत असताना ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्ड चे वाटप आ. केळकर यांच्या हस्ते रविवारी भगवती शाळेच्या मैदानात वाटप करण्यात आले. महिलांना संसाराचा गाडा हाकण्यासाठी या मोफत जनकल्याण डिस्काऊंट कार्डचा हातभार लागणार आहे.


जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील सर्व महिला भगिनी सदस्यांना देण्यात आलेल्या या जनकल्याण कार्डच्या माध्यमातून महिला भगिनी स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी दिलेल्या दुकानांच्या यादीमधून ज्या दुकानात खरेदी करतील तिथे त्यांना १५ ते ५० टक्क्यांपर्यंत विशेष सूट मिळणार आहे.


या आस्थापनांच्या यादीत साड्यांची नऊ, ड्रेस मटेरियल १८, मेन्स वेअर १२, किड्स वेअर तीन, स्टील व क्रॉकरी नऊ, ज्वेलरी घडणावळ आठ कॉस्मेटिक इमिटेशन सहा, फुटवेअर तीन, मोबाईल, आयटी स्टेशनरी तीन, पर्सेस-बॅग्स तीन, फर्निचर तीन, खेळणी युनिफॉर्म आणि मेडीकल स्टोअर प्रत्येकी एक अशा ८०हून अधिक दुकानांचा समावेश आहे. ठाणे शहरातील सर्व घटकातील गरजू महिलांना हे कार्ड वर्षभर वापरता येणार आहे तसेच त्याचे नंतर नूतनीकरणही करता येणार आहे.


यावेळी भाषणात बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, मतांसाठी प्रासंगिक नाही तर  सुरक्षा, सुविधा, सेवा आणि स्वयंरोजगार या चतु:सुत्रीवर मी वर्षभर महिला भगिनींच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून मुलींना ऑनलाइन शिक्षणासाठी मोफत क्लाउड ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचा लाभ सुमारे अडीच हजार मुलींनी घेतला आहे. १०० गरीब-गरजू मुलींना मोफत अँड्रॉइड मोबाईल देण्यात आले. ७५० मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. दीड हजार मुलींना कॉम्प्युटर प्रशिक्षण देण्यात आले. स्वयं रोजगारासाठी दरवर्षी दिवाळी सणात महिला बचतगटाच्या २००-२५० महिलांना स्टॉलच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळत असते. बचतगटाच्या २५ महिला चपाती-भाकरीची ऑनलाईन विक्री करतात. उत्तम पॅकिंग आणि गुणवत्ता असलेले हे अन्न पदार्थ घरपोच दिले जातात. यातून महिलांचे सक्षमीकरण होत आहे. सिव्हिल रुग्णालयात बाळंत महिलांना बाळंत विडा म्हणून आवश्यक साहित्याचे किट देण्यात येत आहे. हे उपक्रम वर्षभर राबवले जातात. अशी माहिती त्यांनी दिली.


महिला विकास परिवाराचे संयोजक पंढरीनाथ पवार, ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी उपमहापौर सुभाष काळे,  परिवहन सदस्य विकास पाटील, व्यापारी आघाडीचे ठाणे शहर अध्यक्ष मितेश शाह, मृणाल पेंडसे, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, नम्रता कोळी व हजारो महिला उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत