‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेंतर्गत 3500 हून अधिक स्वच्छताकर्मींची आरोग्य तपासणी

 


 

     ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यामध्ये विविध ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीमा राबविल्या जात आहेत. यामध्ये लोकसहभागावर भर दिला जात आहे. ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियान अंतर्गत स्वच्छता ही दैनंदिन सवय व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

नवी मुंबईच्या स्वच्छतेमधील मानांकनात दररोज शहर स्वच्छ ठेवणा-या स्वच्छतामित्रांच्या व स्वच्छतासखींच्या कामाचा सर्वात महत्वाचा वाटा असून शहराच्या स्वच्‍छतेची पर्यायाने आरोग्याची काळजी घेणा-या स्वच्छताकर्मींच्या आरोग्याची नवी मुंबई महानगरपालिका जागरुकतेने काळजी घेत आहे.

या अनुषंगाने स्वच्‍छता ही सेवा पंधरवड्यात महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सफाईमित्र सुरक्षा शिबीर’ हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत 23 सप्टेंबर रोजी तंबाखूमुक्त जागरुकता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

त्याच ‘सफाईमित्र सुरक्षा शिबीर’ उपक्रमांतर्गत आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ज्ञानकेंद्रामध्ये तसेच 24 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र याठिकाणी स्वच्छताकर्मींच्या आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 3500 हजारहून अधिक स्वच्छतामित्र आणि स्वचछतासखींची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

मुख्यालयातील शिबीराच्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त्‍ श्री. सुनिल पवार यांनी वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, सहा.आयुक्त अमोल पालवे यांच्यासह भेट देत पाहणी केली.

या आरोग्य तपासणी शिबीरामध्ये डोळे, नाक कान घसा, दंत व मुख तपासणी करण्यात आली तसेच रक्तदाब, मधुमेह तपासणीही करण्यात आली. त्याचप्रमाणे रक्तचाचणी घेण्यात येऊन तपासणी करण्यात आली. तपासणीच्या निदानानुसार आवश्यक त्या स्वच्छताकर्मीचा इसीजी काढण्यात आला. यावेळी मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी 30 बाटली रक्त संकलीत करण्यात आले.  

मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात वाशी व नेरुळ सार्वजनिक रुग्णालयातील 10 डॉक्टर्स, 20 पॅरामेडिकल स्टाफ व 10 मदतनीस यांनी आरोग्य तपासणी व चाचणी कार्यवाही केली. प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातील वैदयकिय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली त्यांच्या परिसरातील स्वच्छता मित्र व स्वच्छता सखींची आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर आरोग्य तपासणीत पुढील उपचार आवश्यक असल्याचे आढळलेल्या स्वच्छताकर्मींवर महापालिका रुग्णालयामध्ये पुढील उपचार मोफत केले जाणार आहेत. यावेळी आभा कार्ड नोंदणीही करण्यात आली.

 स्वच्छता ही सेवा मोहीमेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने आरोग्य विभागाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या विशेष आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घेतलेल्या स्वच्छताकर्मींनी समाधान व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत