28 सप्टेंबरला ‘स्वच्छता रन’ आणि 29 सप्टेंबरला ‘महामार्ग स्वच्छता’ अभियानात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन
‘स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये जाहीर करण्यात आलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यात नवी मुंबई महानगरपालिकेने ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियानांतर्गत आयोजित केलेल्या सर्वच उपक्रमांना नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 18 सप्टेंबरपासून आयोजित विविध कार्यक्रम, उपक्रमांत शहराचे भविष्य असणा-या विद्यार्थी व युवकांची उपस्थितीही लक्षणीय आहे.याच अनुषंगाने दि. 22 सप्टेंबर रोजी आयोजित स्वच्छता सायक्लोथॉनमध्ये 500 हून अधिक सायकलपटूंनी सहभागी होत हा उपक्रम यशस्वी केला.
याच धर्तीवर शनिवार, 28 सप्टेंबर रोजी ‘स्वच्छता रन’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरून सकाळी 6 वा. सुरू होणा-या ‘स्वच्छता रन’मध्ये हजारो नवी मुंबईकर स्वच्छतेचा संदेश प्रसारित करीत धावणार आहेत. लेट्स सेलिब्रेट फिटनेस आणि द लर्नयार्ड या क्रीडा क्षेत्राशी संबंधित संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
स्वच्छता आणि धावणे या दोन्ही आरोग्याशी संबंधित गोष्टी असल्याने या माध्यमातून नवी मुंबईच्या आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेशही प्रसारित होणार आहे. तरी नवी मुंबईकर नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेत आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन आहे.
त्याचप्रमाणे –
रविवार, 29 सप्टेंबर रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यात ‘महामार्गांची महास्वच्छता मोहीम’ राबविली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून जाणारा सायन पनवेल हा नेहमीच वर्दळ असणारा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असला तरी तो नवी मुंबई शहरातून जात असल्याने स्वच्छ शहराच्या मानांकनाच्या दृष्टीने महामार्ग स्वच्छ असणे गरजेचे आहे, हे लक्षात घेत आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही महास्वच्छता मोहीम राबविली जात आहे.
सायन पनवेल महामार्गाप्रमाणेच शहरातील मुख्य ठाणे बेलापूर मार्गाची स्वच्छताही यावेळी सकाळी 7 पासून करण्यात येणार आहे. या माध्यमातून शहराचा आरसा समजल्या जाणा-या व कायम वर्दळ असणा-या या दोन्ही मुख्य मार्गांची सखोल स्वच्छता केली जाणार आहे.
विशेष म्हणजे या महामार्गांची स्वच्छता करताना रेवदंडा, अलिबाग येथील डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्रीसदस्य मोठ्या संख्येने पद्मश्री, महाराष्ट्रभूषण डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या महामार्ग सखोल स्वच्छता महामोहीमेत सहभागी होणार आहेत.
तरी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वा. आयोजित करण्यात आलेल्या सायन पनवेल महामार्ग तसेच ठाणे बेलापूर मार्ग सखोल स्वच्छता मोहीमेत लोकप्रतिनिधी, स्वच्छताप्रेमी नागरिक, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, विविध प्रकारच्या संस्था व मंडळांचे सदस्य, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Post a Comment