भर पावसात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीचे मुक आंदोलन
ठाणे (प्रतिनिधी) बदलापूर येथे आदर्श विद्यामंदिर शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यभरासह देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेने समाजातील विविध घटकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, लोक मोठ्या संख्येने आपला आक्रोश व्यक्त करत आहेत. या संतापाच्या पार्श्वभूमीवर २० ऑगस्ट रोजी संतप्त झालेल्या बदलापूरकरांनी उत्स्फूर्त आंदोलन करत रेल्वे स्थानकात रेल रोको करत कठोर कारवाईची मागणी देखील केली.
या घटनेच्या निषेधार्थ अत्याचार ग्रस्त बालिकांच्या न्यायासाठी महाविकास आघाडीतर्फे आज ठाण्यातील तलावपाळी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून ,हातात काळे झेंडे घेऊन मौन व्रत धारण करत मूक निदर्शने करण्यात आली. या निदर्शनात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे,प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नसीम खान, ठाणे काँग्रेस चे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, काँग्रेस प्रदेश सचिव मनोज शिंदे,प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत पाटील,प्रदेश सचिव संतोष केणे, ठाणे काँग्रेस ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे,राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई,काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह इतर मान्यवर महिला आघाडी तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment