वीज पडून मयत झालेल्या व्यक्तीच्या वारसास ,जिल्हा प्रशासनाकडून 4 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द
ठाणे, (जिमाका):-गोपाळ पदु मेंगाळ रा.भांगवाडी (चासोळे) ता.मुरबाड जि.ठाणे यांच्या शेतघर येथे दि.२२ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५.३५ वाजता त्यांची पत्नी व कुटुंब बसले असता, अचानक त्यांच्या शेतघराजवळ वीज पडली. त्यामध्ये गोपाळ पदू मेंगाळ यांची पत्नी कै.रुखमिनीबाई गोपाळ मेंगाळ यांना वीजेचा झटका लागून त्यांचा मृत्यू झाला. तर गोपाळ पदू मेंगाळ यांच्या कुटुंबातील १) नंदा गुलाब मेंगाळ, २) हेमी अनंता लोभी यांना वीजेचा किरकोळ झटका लागल्याने त्यांना टोकावडे येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच श्रीमती हौसाबाई जैतु हिंदोळा यांना सुध्दा वीजचा किरकोळ झटका बसला असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे मुरबाड तहसिलदार अभिजीत देशमुख यांनी कळविले आहे.
याबाबत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व प्रांताधिकारी विश्वास गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार अभिजीत देशमुख व त्यांच्या इतर सहकार्यांनी पंचनाम्यासह इतर आवश्यक प्रशासकीय सोपस्कार तात्काळ पूर्ण केले व मयत व्यक्तीच्या वारसांना 4 लाख रुपयाचा धनादेश स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

Post a Comment