अक्षयपात्र फाऊंडेशनतर्फे ठामपा शाळांतील विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप
ठाणे : सध्याचे युग हे डिजीटलचे असून ठामपा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही डिजीटलच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रमाची माहिती व्हावी व त्याचा वापर त्यांना अभ्यासासाठी व्हावा यासाठी अक्षयपात्र फाऊंडेशनच्यावतीने ठाणे महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या 9 वी व 10 वी च्या 100 विद्यार्थ्यांना आज टॅबचे वाटप करण्यात आले. ठाणे महापालिकेच्या सहकार्याने आयोजित केलेला हा कार्यक्रम महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडला.
या कार्यक्रमास ठाणे महापालिकेचे उपायुक्त (शिक्षण) सचिन पवार, प्राथमिक विभागाचे समन्वयक प्रकाश बाविस्कर, अक्षयपात्र फाऊंडेशनचे राम कामत, महाराष्ट्र मुख्य समन्वयक उपेंद्र प्रभू, वीर प्लास्टिक ग्रुपचे धीरज जी उपस्थित होते. तसेच ठामपा शाळांचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन शिक्षणाच्या कक्षा रुंदावण्यासाठी या ॲपचा देखील वापर करावा असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. टॅबचा वापर हा अभ्यासासाठीच करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी नमूद केले. तसेच त्यांनी आजच्या जगात डिजिटल साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित केले आणि हे शक्य केल्याबद्दल अक्षय पात्र फाउंडेशन आणि वीर प्लास्टिक्स प्रा. लि. यांच्या योगदानाचे कौतुक केले. असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
ठाणे महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही डिजीटल प्रणालीच्या माध्यमातून शैक्षणिक अभ्यास करता यावा यासाठी आज ठामपा शाळा क्र 7 मानपाडा, शाळा क्र. 9 येऊर, शाळा क्र. 18 या शाळांमधील एकूण 100 विद्यार्थ्यांना 100 लेनोवो टॅब्लेट्स वितरित करण्यात आले. हे टॅब्लेट्स BYJU'S, DIKSHA, खान अकॅडमी, Mathway, ई-पाठशाला, आणि ZOOM सारख्या उच्च माध्यमिक बोर्डच्या अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक सॉफ्टवेअर प्री-लोड केलेले असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सामग्री प्रदान हा उदात्त हेतू असल्याचे अक्षयपात्र फाऊंडेशनचे उपेंद्र दास यांनी नमूद केले.
उपेंद्र नारायण दास यांनी तंत्रज्ञानाच्या समावेशाद्वारे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अनुभव समृद्ध करण्यासाठी फाउंडेशनच्या बांधिलकीवर भर दिला. आजच्या डिजीटल युगात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ठामपा शाळांतील विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. अक्षय पात्र फाउंडेशन ही विस्तृत मध्यान्ह भोजन कार्यक्रमासाठी देखील ओळखले जाते, ज्याचा फायदा भारतभरातील २ दशलक्ष मुलांना होत आहे. तसेच अक्षय पात्र फाउंडेशन ही सेवाभावी वृत्तीने काम करणारी संघटना आहे जी सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना अंमलात आणून विद्यार्थ्यांना सकस व पोषक आहार पुरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नमूद करीत उपेंद्र प्रभू यांनी यावेळी वीर प्लास्टिक्स प्रा. लि. यांचे योगदानाबद्दल विशेष आभार व्यक्त केले. टॅबचे वाटप झाल्यानंतर ठामपा शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते.
Post a Comment