पूजा सुर्वे आणि मानसी सुर्वे यांच्या दोन जिम्नॅस्टची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी
राज्य शासनाने केला संयुक्ता काळे आणि किमया कार्ले यांचा सन्मान
ठाणे, - आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्ट, पंच, प्रशिक्षिका पूजा सुर्वे आणि मानसी सुर्वे यांच्या ठाण्यातील फिनिक्स जिम्नॅस्टिक्स अकादमातील (पीजीए) दोन जिम्नॅस्ट खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नॅशनल गेम्स मध्ये पदक पटकावल्याबद्दल राज्य शासनाने त्याची दखल घेत संयुक्ता प्रसेन काळे हिला ४० लाखांचे तर किमया कार्ले हिला १० लाखांचे पारितोषिक देऊन गौरविले आहे.
जिम्नॅस्ट किमाया कार्ले हिने इजिप्शियन फारो चषक २०२४ मध्ये एक अनोखा विक्रम रचला आहे. १७ वर्षीय किमया एफआयजी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन स्पर्धांमध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली. किमयाने हूप आणि बॉल या दोन्ही अंतिम फेरीत अनुक्रमे 25.50 आणि 25.00 गुणांसह 7 वे स्थान पटकावले. चार ऑलिम्पियन आणि पॅन-अमेरिकन चॅम्पियनशिप पदक विजेत्यांसह १८ देशांच्या कडव्या स्पर्धे दरम्यान ही ऐतिहासिक कामगिरी किमयाने केली आहे.
संयुक्ता प्रसेन काळे या आंतरराष्ट्रीय लयबद्ध जिम्नॅस्टने गोव्यात झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ४२ खेळांमध्ये सर्वोत्कृष्ट महिला अॅथलीट ट्रॉफीसह ५ सुवर्ण आणि १ रौप्यपदक जिंकले.
फिनिक्स जिम्नॅस्टिक्स अकादमीच्या संचालिका पूजा सुर्वे या महाराष्ट्र शासनाच्या श्री शिवछत्रपती पुरस्कार विजत्या, फेडरेशन इंटरनॅशनल जिम्नॅस्टिक्स आंतरराष्ट्रीय पंच आणि पूजा ट्रस्टच्या विश्वस्त आहेत. तिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अंतिम फेरीत पात्र ठरणारी एकमेव लयबद्ध जिम्नॅस्ट म्हणून आपल्या भारत देशासाठी विक्रम रचला आहे आणि १६ वे स्थान पटकावले आहे. तिने विविध वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड कपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
पीजीएच्या मुख्य प्रशिक्षिका मानसी सुर्वे गावंडे फेडरेशन इंटरनॅशनल जिम्नॅस्टिक्स इंटरनॅशनल पंच, ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप थायलंडसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षिका आणि राष्ट्रीय क्रीडा पदक विजेत्या आहेत.
पूजा सुर्वे आणि मानसी सुर्वे या दोन्ही व्यक्तिमत्त्वांच्या कुशल मार्गदर्शनाखाली किमया कार्ले आणि संयुक्ता प्रसेन काळे यांनी मिळवलेले यश हे प्रतिभावान जिम्नॅस्टना प्रोत्साहन देणारे आहे. पीजीएने कठोर प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित केल्याने दोघींना यश मिळाले आहे.
अकादमीच्या संचालिका पूजा सुर्वे आणि मानसी सुर्वे गावंडे यांनी किमाया आणि संयुक्ता यांच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला. देशासाठी आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत आपले प्रयत्न सुरू ठेवण्याची इच्छा दोघींनी व्यक्त केली.
या संपूर्ण प्रवासाबद्दल आर्य क्रीडा मंडळ, श्रीरंग विद्यालय, एसव्हीपीएम स्पोर्ट्स अॅकॅडमी, महाराष्ट्र शासन, भारतीय ऑलिंपिक संघटना, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना यांचे पूजा सुर्वे यांनी आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के, सुलेखा चव्हाण आणि ठाणे जिल्हा जिम्नॅस्टिक्स असोसिएशन यांनी संपूर्ण प्रवासात दिलेल्या पाठिंब्याबद्दल पूजा सुर्वे यांनी आभार मानले आहेत.

Post a Comment