ठाणे महापालिकेत हेल्पर असलेल्या सुरेश भोजनेंचा मुलगा प्रशांत यूपीएससी उत्तीर्ण
ठाणे :
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे . याच दरम्यान बाबासाहेबांचा मंत्र जपणाऱ्या कळव्यातील भोजने कुटुंबातील प्रशांत भोजने यांनी देशात प्रशासकीय पातळीवरील सर्वोच्च समजली जाणारी यूपीएससी ही सर्वाधिक अवघड समजली जाणारी परीक्षा उत्तीर्ण केली आहे . विशेष म्हणजे प्रशांतचे वडील सुरेश भोजने हे ठाणे महापालिकेच्या पाणी खात्यात हेल्पर असून बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच प्रशांतने हे यश मिळवले असल्याचे त्यांनी सांगितले . दरम्यान बुधवारी प्रशांतची मिरवणूक काढण्यात आली यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्याचा सत्कारही केला .
सुरवातीला ठाण्याच्या खारटंन रोड परिसरात राहणारे भोजने कुटुंबीय गेल्या काही वर्षांपासून कळव्याच्या शास्त्रीनगर परिसरात रहात आहे . मूळचे पेन तालुका जिल्हा रायगड येथील सुरेश भोजने हे ठाणे महापालिकेच्या पाणी विभागात हेल्पर या पदावर काम करत असून त्यांचा मुलगा प्रशांत याने दहावीची परीक्षा एम एच शाळेतून उत्तीर्ण केली त्यानंतर ठाणे कॉलेजमधून डिप्लोमा आणि ऐरोली , नवी मुंबई येथील दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयातून आयटी या विषयात पदवी मिळवली. पदवी मिळवल्या पासून त्याने यूपीएससी ची तयारी सुरु केली त्यासाठी ती गेल्या सहा वर्षांपासून दिल्ली येथील राजेंद्र नगर परिसरात घर भाड्याने घेऊन रहात होता . सहा वर्ष चिकाटीने अभ्यास करत असताना सुरू कोणतीही परीक्षा त्याने दिली नाही आणि अखेर मंगळवारी जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत प्रशांत सुरेश भोजने याने आपली मोहोर उमटवली .
ठाणे शहराच्या इतिहासात प्रशांत याने नव्याने मानाचा झेंडा फडकवला आहे .
प्रशांत निकाल लागला तेव्हा दिल्लीला होता मात्र बुधवारी संध्याकाळी तो ठाण्यात आला त्यानंतर त्याची मिरवणूक काढण्यात आली आणि खारटन रोड येथील बुद्ध विहारात त्याचा सत्कार करण्यात आला . प्रशांत चे वडील सुरेश हे फक्त १० वी पर्यंत शिकलेले आहेत तर आई सोनाली या फक्त ८ वी पर्यंत शिकलेल्या आहेत मात्र या दाम्पत्याने चिकाटीने आपल्या मुलाला युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्याचा मार्ग दाखवला आहे .
* बाबासाहेब आंबेडकर हेच आदर्श
आमच्या कुटुंबात यापूर्वी कुणीही एवढी मोठी परीक्षा उत्तीर्ण झालेलं नाही , मी आणि माझी पत्नी दोघांनी जेमतेम शिक्षण घेतले आहे मात्र प्रशांतने आयटी अभियांत्रिकीतून पदवी घेतल्या नंतर बाबाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच युपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली आणि अथक परिश्रम करून ही अवघड परीक्षा उत्तीर्ण केली असे सुरेश भोजने यांनी सांगितले .

Post a Comment