ग्रजी माध्यमातुन जिल्हा परिषद शाळेत प्रवेश
भगवान वेखंडे शहापूर तालुक्यातील मानेखिंड येथून रोजगाराच्या निमित्ताने ते जवळच असलेल्या किन्हवली गावी राहायला आले. रोजगार उपलब्ध झाल्यावर दोन्ही मुलांना चांगले इंग्रजी माध्यमाचे शिक्षण द्यावे अशी सुप्त इच्छा त्यांच्याही मनात निर्माण झाली. त्यांनी दोन्ही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल केले. त्यासाठी लागणारे डोनेशन आणि दरमहाची भरमसाठ फी भरत राहिले. दोन तीन वर्षे गेल्यानंतर मात्र त्यांच्या लक्षात यायला लागले की आपली मुले हुशार असूनही त्यांची अभ्यासात फारशी प्रगती दिसत नाही.
त्याचवेळी किन्हवली पासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेलवली बांगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेची ख्याती त्यांच्या कानावर गेली. NMMS परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन प्रज्ञाशोध परीक्षेच्या निकालात या शाळेचा संपूर्ण ठाणे जिल्ह्यात लौकिक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आणि त्यांनी दोन्ही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून चक्क जिल्हा परिषदच्या शाळेत दाखल केले. दोन्ही मुलांची चाचणी घेतली असता दोन्ही मुले वाचनात व गणिती क्रियांमध्ये देखील खूपच मागे असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक बाळू धानके सरांनी पालकांच्या लक्षात आणून दिले.
दोन्ही विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल शेलवली बांगर शाळेत सुरू झाली. येथील आदर्श परिपाठ, प्रश्नमंजुषा, विद्यार्थ्यांचा वाद्यवृंद, गितमंच, शिक्षण महोत्सव, डिजिटल शिक्षण, व्हर्च्युअल क्लासरूम, क्रीडास्पर्धा, योगसाधना, कवायत, तारखेचा पाढा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन इ. उपक्रमात ते रमून गेले. २०२२ या वर्षात त्यांचा मोठा मुलगा हर्षल वेखंडे ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा ठाणे जिल्हा गुणवत्ता यादीत सिलेक्ट झाला आणि वेखंडे परिवाराच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यांनी सर्व शिक्षकांचा शाळेत येऊन सन्मान केला. "माझ्या मुलांना चौथीत असताना व्यवस्थित वाचन देखील करता येत नव्हते तो 5 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत आला ही खऱ्या अर्थाने शेलवली बांगर शाळेच्या शिक्षकांनी साधलेली किमया आहे" अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.
हे कमी की काय आताच ३१ मार्च २०२४ रोजी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि त्यांचा लहान मुलगा दुर्वेश भगवान वेखंडे हा उत्तीर्ण झाला. मुख्याध्यापक बाळू धानके, वर्गशिक्षक रामदास बांगर, सुधाकर पाटील, रेखा पाटील, काशिनाथ शिंदे, महेश तारमळे, हरी गावंडा यांच्या बहुमोल मार्गदर्शनाने तो अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या पहिल्याच यादीत सिलेक्ट झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळा असे नवे समीकरण आता दृढ हाऊ लागले आहे. इंग्रजी माध्यमातुन मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याकडे पालकांचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होताना दिसत आहे.
Post a Comment