गुढीपाडवा आणि मतदान जनजागृतीसाठी राहनाळ जिल्हा परिषद शाळेत निघाली रॅली
नववर्ष त्याचबरोबर 20 मे 2024 रोजी होणाऱ्या लोकसभेच्या मतदानाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि सीप टीमने मिळून ढोल, ताशा, लेझीमच्या गजरात गावात मतदानाबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी रॅली काढली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी “मतदान सर्व श्रेष्ठ दान, अठरा वर्ष केले पार, आम्ही करू मतदान” अशा विविध घोषणा दिल्या.
या उपक्रमात सीप प्लॅन टीमचे पथक प्रमुख संजय अस्वले, काशिनाथ पाटील, योगेशकुमार पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमिला कडू, उदय पाटील, किरण पवार, शिवकांत खोडदे, अश्विनी पवार, सतीश जोशी, तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
शिक्षक अंकुश ठाकरे यांनी राहनाळ गावातील चौका चौकात विद्यार्थ्यांमार्फत ग्रामस्थांना मतदान करण्यासंदर्भात शपथ दिली. संपूर्ण गावातील लोक दुतर्फा उभे राहून ही रॅली पाहत होते. नववर्ष अर्थात गुढीपाडवा हा आपला हिंदू लोकांचा अत्यंत पवित्र सण आणि त्या पवित्र सणाच्या निमित्ताने आपल्या भारत देशात नांदणारी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक आवश्यक आहे. या निवडणुकीत प्रत्येक प्रौढ व्यक्तीने मतदान करावे. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना मतदान करण्यास सांगावे असे आव्हान पथक प्रमुख संजय अस्वले यांनी उपस्थितांना केले. या उपक्रमाची संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांची होती. या रॅलीची चर्चा सर्वत्र होत आहे
Post a Comment