नवी मुंबईच्या विकासाला गती देणाऱ्या 1129 कोटी रक्कमेच्या विविध सुविधा कामांचे मुख्यमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते ऑनलाइन लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न
महाराष्ट्र राज्याच्या ग्रोथ इंजिनची नवी मुंबई ही अश्वशक्ती असल्याचे सांगत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या 1129 कोटी रकमेच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. मुख्यमंत्री महोदयांच्या वर्षा निवासस्थान येथून दूरदृष्टी प्रणालीद्वारे ऑनलाइन संपन्न झालेल्या या विशेष समारंभप्रसंगी मुख्यमंत्री महोदयांसमवेत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.शंभूराज देसाई, मंत्री ना.श्री. संजय बनसोडे, ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. गणेश नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदा म्हात्रे, विधान परिषद सदस्य आमदार श्री. रमेश पाटील व इतर विधानसभा - विधानपरिषद सदस्य आणि झोपडपट्टी सुधार समितीचे सभापती श्री विजय नाहटा, माजी खासदार श्री संजीव नाईक, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, शहर अभियंता श्री. संजय देसाई, उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, श्री योगेश कडुसकर, डॉ. राहुल गेठे, अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील व श्री. शिरीष आरदवाड आणि महानगरपालिकेचे सर्व कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते
नवी मुंबईत येऊन सर्व प्रकल्पांचे लोकार्पण करायला आवडले असते मात्र कार्य बाहुल्यामुळे तसेच आचारसंहिता जवळ आल्यामुळे ऑनलाइन उद्घाटन करावे लागते आहे याचा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी केला. यावेळी सिडको महामंडळाच्याही विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले.
नावातच नाविन्य असणारे नवी मुंबई हे शहर नेहमीच नवनवीन प्रकल्प राबविण्यामध्ये आघाडीवर असून पर्यावरणपूरक विकास हे महाराष्ट्र शासनाचे धोरण असून आजही विविध प्रकल्पांच्या माध्यमातून नवी मुंबईने पायाभूत सुविधा, भूमिपुत्रांचा विकास आणि लोककल्याणकारी कामांवर भर दिला असल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले.
Post a Comment