राष्ट्रवादी काँग्रेसने केली केंद्र - राज्य सरकारविरोधात जोरदार निदर्शने सरकारला हद्दपार करण्याचा निर्धार

 



ठाणे (प्रतिनिधी)-  देशात सध्या महागाईचा आगडोंब उसळला आहे. शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तरूण बेरोजगार आहेत तर महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यावर तोडगा काढण्याऐवजी सरकार भावनिक खेळ खेळत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. 


देशात जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. एखाद्या राज्यात निवडणुका आल्यास इंधनाच्या दरात दोन रूपये कपात करून नंतर पाच रूपये वाढविले जात आहेत. दोन कोटी रोजगाराचे आश्वासन देऊनही तरूणांच्या हाताला रोजगार देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. तसेच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही वाढीस लागले आहेत. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी गुरूवारी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार,  महिलाध्यक्षा सुजाताताई घाग, महिला कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील,  युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने केली. यावेळेस कार्यकर्त्याकडून केंद्र आणि राज्य सरकारचा धिक्कार केला. "बस हुई महँगाई की मार,नही चाहिये मोदी सरकार; सरकार करतंय अंगणवाडी सेविकांचा छळ,यावेळी नाही मिळणार राज्य-केंद्र सरकारला बळ; उच्च शिक्षण घेऊन पकोडे तळायचे ? यावेळी जुमलेबाजांना खाली खेचायचे; बळीराजा घेतोय फाशी, सरकार खातंय तुपाशी; पेट्रोल-डिझेल झाले शंभरीपार, सरकारला करू या कायमचे हद्दपार" असे संदेश असणारे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते.  या कार्यकर्त्यांनी महागाई, बेरोजगारी, शेतकरी समस्या, स्पर्धा परीक्षा, महिला अत्याचार आदींबाबतच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 


यावेळी सुजाताताई घाग यांनी, देशाच्या कानाकोपऱ्यात महिलांवरील अत्याचार वाढीस लागले आहेत. मणीपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली जात असतानाही सत्ताधारी ब्र काढायला तयार नाहीत. अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडल्या असल्याने महिलांना घर चालवताना प्रचंड कसरत करावी लागत आहे. देशाचे अर्थखाते महिलेकडे असूनही त्यांना महिलांचे प्रश्न समजत नाहीत, हे आमचे दुर्दैव आहे. त्यामुळेच आम्ही या सरकारचा निषेध करीत आहोत, असे सांगितले.  तर, विक्रम खामकर यांनी,  सन 2014 मध्ये अच्छे दिनचे स्वप्न दाखवून मोदी सरकार सत्तेवर आले. तेव्हापासून जनतेची पिळवणूकच सुरू आहे. सातशे रूपयांच्या सिलिंडरने हजारी गाठली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी होऊनही देशात इंधनाचे दर कमी केले जात नाहीत. दोन कोटी तरूणांना रोजगार देण्याचे आश्वासनही जुमलाच ठरला आहे. उलट महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवून नेले जात आहेत. त्याचे कोणतेही सोयरसुतक राज्य सरकारला नाही.  शेतीमालास हमी भाव दिला जात नाही. महिलांना सुरक्षेची हमी राहिलेली नाही. या देशातील प्रत्येक घटक नाडलेला आहे. त्रासलेल्या जनतेचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचविण्यासाठीच आम्ही हे आंदोलन केले, असे सांगितले. 


या आंदोलनात   विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे,  राहू पाटील,   ओबीसी सेल अध्यक्ष गजानन चौधरी, दिगंबर लवटे, सामाजिक न्याय विभागाचे बाळेस हत्तीअंबीरे, ज्येष्ठ नागरिक सेलचे दिलीप नाईक,  हाॅकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधरे,व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षेत्रीय, असंघटीत कामगार सेलचे अध्यक्ष राजू चापले, प्रदेश सरचिटणीस कैलास हावळे, बागेश गंगा सोनी, एकनाथ जाधव, संतोष भोईर,  शिवा कालुसिंग,  रचना वैद्य,  संदीप यादव, महेद्र पवार, विक्रांत घाग,  संतोष मोरे, विलास पाटील,विशाल खामकर, रत्नेश दुबे,संतोष साटम,अनिकेत कलमाने,राजेश साटम,श्रीकांत भोईर,संदीप ढकोलिया,कुणाल भोईर, समीर नेटके, सोनू गोवडा, चंद्रकांत तांबडी, रोहिदास पाटील, अंकुश मढवी, तुकाराम गायकवाड, भूषण भगत, आशिष वाघ, पप्पू अस्थाना, फिरोज पठाण  बी.के. सोनी, निखील तांबे, सुभाष आग्रे,  फुलबानो पटेल, ज्योती निंबर्गी, माधुरी सोनार, हाजीबेगम शेख,  शुभांगी कोळपकर,  वंदना हुंडारे , वंदना लांडगे, वंदना भाईंगडे, राणी देसाई,  मनिषा भाबड,  संगीता चंद्रवंशी, संगीता शेळके, रेश्मा भानुशाली, सुजाता गायकवाड,  लक्ष्मी पवार, शुभांगी खेडकर, मल्लिका पिल्ले, शितल कुडाळकर,  हाजी बेगम शेख,  मनिषा पाटील,  सुनिता खरात, सुनिता मोकाशी, वनिता भोर, रूबिना शेख, सोनल साबत, राजश्री गुरव,  रेश्मा सय्यद,  प्रतिभा पुर्णेकर, मनिषा भाबड, रेणू अलगुडे, संगीता चंद्रवशी आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत