डॉ. श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार प्रदान - लोकसभेतील कामगिरीचा गौरव, सर्वोत्कृष्ट पाच सदस्यांमध्ये समावेश.
दिल्ली : महाराष्ट्रातील कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. लोकसभेतील कामगिरीवरून संसद रत्न पुरस्कार देण्यात येतो. कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये विकासाचा वेगळा पॅटर्न राबवणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे लोकसभेतही सर्वच कामकाजात सहभाग घेत असतात. त्यांच्या याच कामगिरीवरून यंदाचा पुरस्कार डॉ. शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. तर हा संसद रत्न पुरस्कार मिळणे अत्यंत आनंदाची बाब असून मिळालेला पुरस्कार माझ्या मतदारसंघातील जनतेला समर्पित करत असल्याच्या भावना यावेळी डॉ. शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे १७ व्या लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेल्या पाच सदस्यांपैकी एक ठरले आहेत. २०१९ ते २०२३ या कार्यकाळात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ५५६ प्रश्न उपस्थित केले आहेत. ६७ चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे आणि १२ खासगी विधेयके त्यांनी मांडली आहेत. १९९९ या वर्षात स्थापन झालेल्या प्राईम पॉइंट फाउंडेशन या एनजीओला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी संसद रत्न पुरस्काराबाबत सूचना केल्या होत्या. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार, २०१०पासून लोकसभेतील आणि राज्यसभेतील सदस्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल संसद रत्न पुरस्कार देण्यात येतो. दरवर्षी संसद रत्न पुरस्कार प्रदान केला जातो. तर संसद महारत्न पुरस्कार दर पाच वर्षातून एकदा दिला जातो. केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाचे माजी सहसंचालक आदी या पुरस्कारासाठी नावांची शिफारस करतात. हा एक प्रकारचा नागरिक सन्मान समजला जातो. लोकसभा आणि राज्यसभा यातील कामकाजामध्ये घेतलेला सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, मांडलेले प्रस्ताव, संसदेतील उपस्थिती आणि एकूण कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात, यंदाचा हा पुरस्कार कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना जाहीर झाला होता. आज, शनिवारी, मान्यवरांच्या मुख्य उपस्थितीत दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना संसद रत्न तर शिवसेनेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार पुरस्काराने गौरविण्यात आले. लोकसभेतील कामकाजात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे नियमितपणे सहभागी होत असतात. आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने गरजेच्या मुद्द्यांवर डॉ. शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
कल्याण लोकसभा मतदारसंघातही पायाभूत सुविधा उभारण्यापासून सर्वच टप्प्यांवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. त्यांच्या याच कामगिरीची दखल घेऊन त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. २०१४च्या लोकसभेत निवडून आलेले डॉ. श्रीकांत शिंदे हे तरुण खासदारांपैकी एक खासदार होते. २०१९ च्या निवडणुकीतही डॉ. श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते सुपुत्र आहेत. संसद रत्न पुरस्कार मिळाल्यामुळे डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामगिरीच्या शिरपेच्यात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
.jpeg)
Post a Comment