शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी जलरथाचे आयोजन

 



ग्रामीण भागात लोकसहभागातून शाश्वत पाणीपुरवठा, गावातील पाण्याचे स्त्रोत शाश्वत स्वरूपात निर्माण करून बळकट करणे या उद्देशाने जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन टप्पा -२ अंतर्गत गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार या योजना विषयी ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जल रथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पाच तालुक्यासाठी तयार करण्यात आलेल्या या जल रथाचा आज शुभारंभ गटविकास अधिकारी पंचायत समिती मुरबाड श्री. श्वेता पालवे, गटविकास अधिकारी पंचायत समिती अंबरनाथ श्री.नारायणसिंग परदेशी, गटविकास अधिकारी पंचायत समिती शहापूर श्री. भास्कर रेंगडे यांच्या हस्ते तालुका स्तरावर करण्यात आला. 


यावेळी तालुका स्तरावर उप अभियंता शहापूर श्री.जाधव, उप अभियंता मुरबाड श्री. बनकरी, विस्तार अधिकारी सर्व, कार्यक्रम व्यवस्थापक श्री. अनिल निचीते, सर्व शाखा अभियंता, सर्व संपर्क अधिकारी, सर्व कर्मचारी स्वच्छ भारत मिशन, तालुका स्तरीय कर्मचारी, भारती जैन संघाचे प्रचारक उपस्थित होते. 


गावातील ग्रामस्थांनी जल रथाच्या माध्यमातून योजनाची माहिती घेऊन गावातील पाण्याचे स्त्रोत, तलावातील गाळ काढण्याची मागणी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक श्री. पंडीत राठोड, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे. 


ग्रामस्थांचा लोकसहभाग वाढवा यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३५१ तालुक्यातील गावांमध्ये जल रथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील ५ तालुक्यात जल रथाद्वारे प्रचार प्रसिद्धी करण्यात येईल. या ५ रथावर सनियंत्रणासाठी जिल्हा कक्षावर नोडल अधिकारी म्हणून जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक, तालुका पातळीवर गट विकास अधिकारी तसेच शासन नियुक्त प्रतिनिधी भारतीय जैन संघटना प्रतिनिधी जिल्हा व तालुका पातळीवर रथाचे नियोजन करणार आहेत.

       

गावात जल रथाच्या माध्यमातून ऑडिओ जिंगल्स, गावात पोस्टर्स लावण्यात येणार आहे. ग्रामस्थांना हस्तपत्रिका दिले जाणार आहेत, तसेच नियुक्त केलेल्या समन्वयका मार्फत योजनेची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार आहे. गावातील जलस्त्रोत, तलावातील गाळ काढण्याची मागणी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थांनी करावी व पोर्टलवर मागणी तात्काळ ऑनलाईन करण्यात येईल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत