सिव्हिल रुग्णालयात महिलेच्या पोटातून काढला दहा किलोचा गोळा
ठाणे जिल्हा सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांनी एका गरीब महिला भाजी विक्रेत्यावर जटील शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून सुमारे दहा किलो वजनाचा मांसाचा गोळा काढला आहे. पाच जणांच्या टीमने ही कामगिरी केली. आता ही रुग्ण महिला बरी झाली असून सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, उल्हासनगर परिसरात राहणारी गरीब भाजीविक्री करणाऱ्या एका ४८ वर्षीय महिलेला पोटात दुखते म्हणून उल्हासनगरातील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते. तपासणी अंती तिच्या गर्भाशयाजवळ मोठा गोळा असल्याचे निदान झाले. त्यामुळे तेथून तिला
२० जानेवारी रोजी पुढील उपचारासाठी सिव्हील रुग्णालयात पाठविण्यात आले. सिव्हिल रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (ता.२९) महिलेची शस्त्रक्रिया करून तिच्या पोटात असलेला सुमारे दहा किलो वजनाचा पाण्याने भरलेला मांसाचा गोळा बाहेर काढला. अशी माहिती स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्रेया शेळके यांनी दिली.
महिलेच्या गर्भाशय पिशवीची सोनोग्राफी आणि सिटीस्कॅन केल्यानंतर तिच्या पोटात गोळा असल्याचे निदान झाले. हा गोळा शस्त्रक्रिया करून बाहेर काढणे आवश्यक होते. अन्यथा रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. ही शस्त्रक्रिया थोडी अवघड होती. शिवाय रुग्ण महिलेला थायरॉईडचा त्रास होता, परंतु रुग्णालयाच्या निष्णात डॉक्टरांनी अथक परिश्रम घेऊन ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. यासाठी सुमारे दोन तासांचा अवधी लागला. स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. श्रेया शेळके, भूल तज्ज्ञ डॉ. प्रियांका महांगडे, डॉ. स्मिता माळी आणि कर्मचारी रत्नाकर ठाकरे आणि नितीन राठोड यांनी ही कामगिरी केली.
महिलांच्या शरीरातील बदलामुळे असा गोळा होण्याची शक्यता असते. या रुग्ण महिलेचा पोटात झालेला हा गोळा अशाच प्रकारचा आहे. अशा गोळ्यामुळे सारखे पोटात दुखणे, अपचन, नैसर्गिक विधी करताना त्रास होणे अशी लक्षणे आढळतात. असा गोळा कर्करोगाचा देखिल असू शकतो. त्यामुळे तपासणी करण्यासाठी तो वैद्यकीय प्रयोग शाळेत पाठवण्यात आला आहे.
डॉ. कैलास पवार, जिल्हाशल्य चिकित्सक, ठाणे
Post a Comment