ठाण्यातील जलतरणपटू मानव मोरे, आयुष तावडे यांनी केला सलग 24 पोहण्याचा विक्रम
ठाणे, : सलग 24 तास ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरण तलावात पोहण्याचा विक्रम ठाण्यातील दोन जलतरणपटूंनी केला आहे. मानव मोरे व आयुष तावडे हे राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू असून त्यांनी केलेल्या या विक्रमाचे ठाणेकरांकडून कौतुक होत आहे.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अनोख्या पध्दतीने जलतरणपटू मानव मोरे व आयुष तावडे यांनी मानवंदना दिली आहे. 26 जानेवारी रोजी दुपारी 12.25 मिनिटांनी या दोन्ही जलतरणपटूंना माजी आमदार रविंद्र फाटक व आमदार निरंजन डावखरे यांनी झेंडा दाखविल्यानंतर या जलतरपटूंनी तरणतलावात उडी मारली. या दोन्ही जलतरणपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी ठाण्यातील मान्यवर उपस्थित होते.
सलग 24 तास पोहल्यानंतर 27 जानेवारी रोजी दुपारी 12.25 मिनिटांनी त्यांचे पोहणे थांबले तेव्हा त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. तरणतलावात सलग 24 तास पोहण्याचा विक्रम होण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच वेळ आहे. मानव मोरे हा 18 वर्षाचा तर आयुष तावडे हा 14 वर्षाचा जलतरणपटू आहे, सलग 24 तास पोहून त्यांनी प्रजासत्ताक दिनी भारतीय ध्वजाला सलामी तर दिलीच परंतु धर्मवीर आनंद दिघे यांना देखील जयंतीदिनी मानवंदना दिली. या दोन्ही जलतरणपटूंचे कौतुक करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, सुधीर बर्गे, उपायुक्त क्रीडा मीनल पालांडे, सहाय्यक आयुक्त् महेश आहेर, तरणतलाव उपव्यवस्थापक रवी काळे, महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर, निरीक्षक अजय फाटक, शैलेश सिंग, ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे सचिव अतुल पुरंदरे, स्टारफिश स्पोटर्स फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अनिल दगडे, मनोज कांबळे आंतरराष्ट्रीय जलतरणपटू मयंक चाफेकर आदी उपस्थित होते.
ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे जलतरणपटू मानव मोरे व आयुष तावडे हे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहे. त्यांनी केलेल्या विक्रमाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment