ठाणे महापालिका क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रा झाली सुरू
लोकप्रतिनिधी आणि महापालिका आयुक्त यांनी दिली भेट
पहिल्या दिवशी दोन ठिकाणी झाली शिबिरे
सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे पालिकेचे उद्दीष्ट
ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ मंगळवारी सकाळी अॅपलॅब चौक, मॉडेला मिल नाका येथील शिबिरात झाला. महापालिका क्षेत्रात एकूण ७४ ठिकाणी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. आजचे दुसरे शिबीर साई हॉस्पिटल, शिवाजीनगर या भागात झाले.
शुभारंभाच्या कार्यक्रमात, आमदार अॅड. श्री. निरंजन डावखरे, माजी महापौर श्री. नरेश म्हस्के, माजी नगरसेवक श्री. संजय वाघुले, श्री. विकास रेपाळे, सौ. नम्रता भोसले, तसेच, श्री. सुजय पत्की, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (१) श्री. संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) श्री. प्रशांत रोडे, सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आदी मान्यवर सहभागी झाले. त्यांनी शिबिरातील सर्व स्टॉलना भेटी देऊन योजनांचे स्वरुप, लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा यांची माहिती घेतली. तसेच, अधिकाधिक लोकांपर्यंत ही यात्रा पोहोचवण्यासाठी सूचनाही दिल्या. मान्यवरांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाची पाहणी केली. तत्पूर्वी विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या हस्ते रथाचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी या यात्रेचे उद्दीष्ट स्पष्ट केले. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांना या उपक्रमाची माहिती देणे आणि सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे हे यात्रेचे उद्दीष्ट असल्याचे आयुक्त श्री. बांगर म्हणाले. देशभरात असे रक्ष सर्वत्र जाणार आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात ७४ ठिकाणी ही यात्रा जाईल. त्याची पूर्व तयारी गेल्या १५ दिवसांपासून सुरू होती, असेही श्री. बांगर यांनी सांगितले.
पीएम स्वनिधी या फेरीवाल्यांसाठी असलेल्या कर्ज योजनेत मुंबई महानगर क्षेत्रात ठाण्याने चांगली कामगिरी केली आहे. तसेच, पीएम ई बस या योजनेच्या पहिल्या टप्प्यातही ठाणे शहराचा समावेश झाला आहे. त्यातूून फेब्रुवारी २०२४पर्यंत १०० बसगाड्या उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती श्री. बांगर यांनी दिली.
स्वच्छ भारत अभियानाचा संदेश पोहोचवणे हाही या यात्रेचा उद्देश आहे. स्वच्छतेच्या बाबतीत मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे कमालीचे आग्रही आहेत. रस्त्यावरील धूळ, कचरा, डेब्रिज याचा त्यांना पराकोटीचा तिटकारा आहे. त्याबद्दल ते वेळोवेळी निर्देश देतात, असेही श्री. बांगर यांनी नमूद केले. या सर्व योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि माध्यमांनी सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. बांगर यांनी केले.
पीएम स्वनिधी या योजनेतून कर्ज मिळालेल्या स्नेहा जाधव, संगीता गुरव, माणिकराव आठवले आणि श्री. खैरे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. कोरोनाच्या काळात वाईट परिस्थिती असताना पीएम स्वनिधीतील कर्जाने खूप मोठा आधार दिला. ही योजना ठाणे महापालिकेमार्फत समजली आणि त्याची अमलबजावणीही वेगाने झाली, असे लाभार्थी म्हणाले. ही पीएम स्वनिधी योजना म्हणजे नवसंजिवनी योजना आहे, असेही त्यांनी सांगितले.
*विकसित भारत संकल्प यात्रेचे वेळापत्रक*
२९ नोव्हेंबर - स. १० ते दु. १.३० - भटवाडी, किसननगर नं. ३
दु. २.३० ते सायं. ५.३० - किसननगर
३० नोव्हेंबर - स. १० ते दु. १.३० - वागळे सर्कल
दु. २.३० ते सायं. ५.३० - आशर आयटी पार्क
०१ डिसेंबर - स. १० ते दु. १.३० - कशीश पार्क
दु. २.३० ते सायं. ५.३० - मनोरुग्णालय चौक
०२ डिसेंबर - स. १० ते दु. १.३० - इटर्निटी मॉल चौक
दु. २.३० ते सायं. ५.३० - बारा बंगला चौक
०३ डिसेंबर - स. १० ते दु. १.३० - शिवमंदिर, कोपरी
दु. २.३० ते सायं. ५.३० - ठाणे रेल्वे स्टेशन पूर्व
०४ डिसेंबर - स. १० ते दु. १.३० - अष्टविनायक चौक, कोपरी
दु. २.३० ते सायं. ५.३० - नारायण कोळी चौक, कोपरी
*यात्रेचे स्वरूप*
विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत दर दिवशी दोन ठिकाणी कॅम्प नियोजित असणार आहेत. शहरी भागाकरिता असलेल्या योजनांपैकी महापालिकेशी संलग्न पीएम स्वनिधी, स्वच्छ भारत मिशन, पीएम ई-बस सेवा, अमॄत (पाणीपुरवठा व मलनिस्सारण), पंतप्रधान आवास योजना (PMAY) या योजनेबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे
कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉलची उभारणी, आरोग्य शिबीर, क्षयरोग तपासणी व औषधोपचार शिबीर असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ही विकसित भारत संकल्प यात्रा सुरू झाली आहे. ती २४ जानेवारी २०२४ पर्यंत विविध ठिकाणी सुरू राहणार आहे. या कार्यक्रमासाठी डिजिटल स्क्रीन असलेला रथ सज्ज करण्यात आला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ७४ ठिकाणी या व्हॅन जातील. या माध्यमातून विविध शासकीय योजनांची प्रसिद्धी केली जाणार असून गरजू लाभार्थ्यांचा शोध घेणे, त्यांना प्रत्यक्ष योजनांची माहिती देणे, त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हे उपक्रम अगदी तळागाळापर्यंत राबविले जाणार आहेत. त्या दृष्टीने केंद्र शासनाच्या नीती आयोगाच्या संचालक श्रीमती जागृती सिंगला, ठाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन करण्यात आले आहे.

Post a Comment