flowers

तरुणांनो झेपेल तेवढीच उडी घ्या! नेत्रतज्ञ डॉ.तात्याराव लहाने यांचे आवाहन

 


ठाणे,

 " शहरांपेक्षा खेड्यातील तरुणांच्या अपेक्षा फार कमी असतात. खेड्यातील तरुण लवकर निराश न होता ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करत राहतात. त्याचवेळी शहरातील तरुण कोलमडून जातात. तेव्हा तरुणांनी झेपेल तेवढीच उडी घ्यावी." असे आवाहन नेत्रतज्ञ डॉ.तात्याराव लहाने यांनी केले. डॉ.वा.ना.बेडेकर स्मृती व्याख्यानमालेचे ३९ वे पुष्प गुंफताना "माझा शैक्षणिक प्रवास" या विषयावर ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.विजय बेडेकर, प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक, उपप्राचार्य डॉ.महेश पाटील उपस्थित होते.

   "यशस्वी जीवनासाठी खडतर परिश्रम करण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे, असे सांगून डॉ.लहाने पुढे म्हणाले,आजचा काळ प्रचंड स्पर्धेचा आहे.या स्पर्धेत टिकायचे असेल तर छोटी छोटी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी अथक मेहनत करायला हवी. ही मेहनत करताना स्वतःचा तोल ढळू देऊ नका. मोबाईलचा अतिवापर टाळण्याचा सल्लाही त्यांनी दिला.खेड्यातील तरुणांच्या अपेक्षा फार कमी असतात. छोटे ध्येय ठरवून ते प्रवास करीत राहतात. शहरातील तरुण मात्र लगेच मोठा उद्योगपती होण्याचे स्वप्न पाहतात. अपयश आले की निराश होतात. खेड्यातील तरुण लवकर निराश होत नाहीत.ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करत राहतात. परंतु शहरातील तरुण मात्र कोलमडून गेलेले पाहायला मिळतात. तेव्हा तरुणांनी झेपेल तेवढीच उडी घ्यावी. असे डॉ. लहाने यांनी सांगितले.

    यावेळी डॉ.विजय बेडेकर, प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे निवेदन डॉ.संतोष राणे यांनी केले. या व्याख्यानमालेसाठी अनेक ठाणेकर नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत