Folowers

दिवा-डोंबिवली बस सेवा आजपासून सुरु

 


ठाणे, दिवा ता १२ ऑक्टो  : अनेक वर्षांपासून मागणी असलेली दिवा ते डोंबिवली ही ठाणे महानगरपालिका परिवहनची (टीएमटी) बस सेवा अखेर आज पासून दिवा शिवसेनेचे शहरप्रमुख तथा मा. उप महापौर रमाकांत मढवी यांच्याहस्ते श्रीफळ फोडून बसच्या नवीन मार्गाचा शुभारंभ करण्यात आला. दिवा शहराला डोंबिवली शहाराला जोडण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. उपमहापौर रमाकांत मढवी व स्थानिक सर्व मा.नगरसेवक यांच्या अथक प्रयत्नाने नवीन बसेस मार्ग आजपासून सुरू करण्यात आला  आहे. ठाणे परिवहनचा नवीन बस क्रमांक (क्रमांक ७६३) आज १२ ऑक्टोंबर रोजी सुरू झाला असून या मार्गावर सुरुवातीला दिवा- डोंबिवली आठ फेऱ्या असणार आहेत. याचा फायदा दिवा शहरातील दिवा चौक ते डोंबिवली प्रवासात अनेक गावे व शाळा येत आहेत त्यांना होणार आहे. दातीवली चौक, अगासन,  बेतवडे, ऊसरघर, संदप, मायसिटी, मानपाडा, दावडी नाका, पेंढारकर कॉलेज, शेलार नाका व डोंबिवली स्टेशन पूर्व या रूट प्रमाणे बस धावणार असून याच रूट ने पुन्हा दिवा येथे येणार आहे. यापूर्वी बस अभावी या लांबपल्याच्या अंतरासाठी प्रवाश्यांना रिक्षा किंवा इतर खासगी वाहनावर अवलंबून राहावे लागत होते. ही बस सेवा सूरु झाल्याने शालेय विद्यार्थ्यांना मोठया प्रमाणावर फायदा होणार असून होणारे आर्थिक नुकसान देखील वाचणार आहे. 


याप्रसंगी दिवा शिवसेनेचे मा.नगरसेवक शैलेश पाटील,अमर पाटील, दीपक जाधव, दर्शना चरणदास म्हात्रे, युवा अधिकारी साक्षी मढवी, उमेश भगत, आदेश भगत, गुरुनाथ पाटील, विनोद मढवी, सचिन चौबे, निलेश म्हात्रे, शशिकांत पाटील, जयदास शेलार, जयराम पाटील आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बसेस चे वेळ व भाडे : 

पहिली बस सकाळी दिवा चौक येथून ७ .३० वाजता तर शेवटची बस रात्री ८ वाजता सुटणार आहे. बस भाडे सर्वात कमी शुल्क ७ रुपये असेल, तर कमाल दर २३ रुपये असेल असे कळविण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत