*• बुधवार, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता.*
*• स्थळ - काशिनाथ घाणेकर मिनी प्रेक्षागृह*
*• ठाणे महानगरपालिकेची ‘विचारमंथन व्याख्यानमाला’*
*• दहावे पुष्प*
ठाणे : जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या विचारमंथन व्याख्यानमालेत प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांची 'या 'मी मी'चं काय करायचं?', या विषयावर प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. डॉ. नाडकर्णी यांची ही मुलाखत लेखिका आणि निवेदिका हर्षदा बोरकर घेणार आहेत. बुधवार, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता ही मुलाखत काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे.
मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने, दैनंदिन जीवनातील ताण तणाव यांचा सामना कसा करावा, स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना कोणती पथ्ये पाळावीत आणि मानसिक आरोग्य सृदृढ करण्याबरोबरच ज्यांना मानसिक आजार आहे त्यांच्याप्रती सहवेदना ठेवून कसे आचरण करावे याबद्दल डॉ. आनंद नाडकर्णी मार्गदर्शन करणार आहेत.
डॉ. नाडकर्णी हे ठाण्यातील विख्यात मनोविकारतज्ज्ञ, विचारवंत, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. उत्तम प्रज्ञा, तीव्र संवेदनशीलता आणि सकारात्मक वृत्ती यांची देणगी त्यांना लाभली आहे. त्यांनी सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस (१९८०), आणि के.ई.एम. हॉस्पिटल इथून डिप्लोमा इन सायकॉलॉजिकल मेडिसिन ही पदविका आणि एमडी(मनोविकारशास्त्र) (१९८४) हे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. एमडीच्या परीक्षेत मुंबई विद्यापीठाच्या सुवर्णपदकाचे ते मानकरी ठरले. पदव्युत्तर शिक्षण सुरू असतानाच, मानसिक आरोग्य आणि त्यावरील उपचार – या बाबतींत असलेले अज्ञान, पूर्वग्रह आणि, रुग्ण व डॉक्टर्स यांच्यातील अत्यंत विषम प्रमाण, ह्या बाबतींत संस्थात्मक पातळीवर प्रयत्न करायला हवेत, हा विचार त्यांच्या मनात रुजला. त्यांच्या अध्यापकांशी होणाऱ्या संवादांतून, तो दृढमूल होऊन १९९० साली इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच) ही संस्था उभी राहिली. आज ‘आयपीएच’ ही संस्था मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, ॲमिटी युनिव्हर्सिटी यांचे मान्यताप्राप्त शैक्षणिक केंद्र असून जगभरातील देशांतून अनेक मनआरोग्य व्यावसायिक तिथे अभ्यासार्थ येतात.
डॉ. नाडकर्णी यांचे व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील कामही असेच पथदर्शी आहे. ८०च्या दशकांत गर्दच्या विळख्यात सापडलेल्या तरुणांवरील उपचार, ते त्यांच्या सहभागाने उभ्या राहिलेल्या, मुक्तांगण ह्या व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राचे आजचे स्वरूप - हा त्यांच्या कार्याचा प्रवास लक्षवेधी आहे. ते औद्योगिक क्षेत्रातील तीसहून अधिक संस्थांसाठी आणि अनेक स्वयंसेवी संस्थांसाठी मानसिक आरोग्य आणि आनुषंगिक विषयांचे सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून काम करतात.
डॉ. नाडकर्णी एक शैलीदार ललित लेखक, कवी आणि नाटककार, अभिनेता, संगीतकार, तबलावादक, मर्मज्ञ संगीतप्रेमी आणि सूत्रसंचालक, तत्त्वज्ञानाचे कृतिशील अभ्यासक आहेत. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यातून सहजतेनं प्रकटतात. त्यांच्या साहित्यकृतींत – वैद्यकसत्ता, किंचित, आरोग्याचा अर्थ, मनोगती, गद्धेपंचविशी, स्वभाव विभाव, शहाण्यांचा सायकिॲट्रिस्ट, विषादयोग, मितुले आणि रसाळ, हेही दिवस जातील (कादंबरी), जन्मरहस्य (नाटक), त्या तिघांची गोष्ट (नाटक), गेट वेल सून (नाटक), सोबतीने चालताना (नाटक), रंग माझा वेगळा (नाटक) आदिंचा समावेश असून त्यांना महाराष्ट्र शासनाचे साहित्यविषयक पुरस्कार, मसाप पुरस्कार, ‘साहित्य संस्कृती मंडळाचा पुरस्कार आदि एकोणीस प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. नाडकर्णी यांना त्यांच्या वैद्यकीय, व्यसनमुक्ती आणि साहित्य ह्या क्षेत्रांतील कारकिर्दीबद्दल विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांत इंडियन मर्चंटस् चेंबरच्या अमृतमहोत्सवी वर्षांतील व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्याबद्दलचा पुरस्कार, ठाणे महापालिकेतर्फे साहित्यविषयक कामगिरीसाठी देण्यात येणारा पी. सावळाराम पुरस्कार, वैद्यकविषयक लेखनाबद्दलचा शतायुषी पुरस्कार, ‘युथ ॲक्टिव्हिस्ट ऑफ द इयर’ हा डॉ. अरुण लिमये स्मृती पुरस्कार, ठाणे नगररत्न पुरस्कार, ठाणे भूषण पुरस्कार, समाजशिक्षक पुरस्कार, आरोग्य ज्ञानेश्वर पुरस्कार आदिंचा समावेश आहे.
*मुलाखतकार हर्षदा बोरकर*
तर, मुलाखतकार हर्षदा बोरकर या नृत्यांगना, अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका आणि निवेदिका आहेत. गतिमंद व मतिमंद मुलांसाठी विश्वास चॅरिटेबल ट्रस्टमध्ये कलेतून व्यक्तिमत्त्व विकासासाठी सक्रीय मार्गदर्शन. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी प्रेरित ‘ लोकवस्तीतील जनतेसाठीच्या वंचितांचा रंगमंच चळवळीत संयोजक या नात्याने त्या कार्यरत आहेत. बहिणाबाईंच्या जीवनावर आधारित ‘माझी माय सरसोती‘ नाटकाचे दिग्दर्शन आणि 'जन्मवारी' या व्यावसायिक नाटकाचे लेखन व दिग्दर्शन त्यांनी केले आहे.
*विचारमंथन व्याख्यानमाला*
ठाणे महापालिकेच्या वतीने महनीय व्यक्तींच्या जयंती तसेच पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले जाते. त्याचबरोबरीने, ज्या महनीय व्यक्तींचे स्मरण केले जाते, त्यांचे कार्य व माहिती कळावी, त्यांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी ‘विचारमंथन व्याख्यानमाले’त मान्यवर व्यक्तींचे व्याख्यान आयोजित केले जाते. या व्याख्यानमालेतील हे दहावे पुष्प असून ठाणेकरांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
महनीय व्यक्तींच्या विचारांचे मंथन व्हावे, ते विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत. तसेच, वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात त्या विचारांचा अंगीकार व्हावा, हे ‘विचारमंथन व्याख्यानमाले’चे प्रयोजन असल्याचेही आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले आहे. आजवर या व्याख्यानमालेत डॉ. अनिल काकोडकर, श्री. बाबा भांड, श्री. हरी नरके, प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, प्रा. डॉ. शरद गायकवाड, प्रा. डॉ. रमेश जाधव, डॉ. सदानंद मोरे, श्री. श्रीकांत बोजेवार यांनी महनीय व्यक्तिमत्वांची वैशिष्ट्ये उलगडून दाखवणारी व्याख्याने दिली आहेत.
Post a Comment