मो.ह. विद्यालय केवणी दिवे च्या शाळेत कोमसापचे `राज्यभाषा मराठी समृद्ध अभियान'
भिवंडी ः मो.ह. विद्यालय भाग विद्यालय केवणी दिवे आणि कोकण मराठी साहित्य परिषदेची ठाणे शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
इयत्ता नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांनी निसर्गकवी ना. धो. महानोर यांचा साहित्य प्रवास सादर केला. महानोर यांच्या कविता, जीवनपट, गाणी, चित्रकाव्य, समूहगीत अशा विविध माध्यमातून महानोरांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी यावेळी विविध साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनींनी केले.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे ठाणे शहर अध्यक्ष ऍड. मनोज वैद्य यांनी राज्यभाषा मराठी समृद्ध अभियानाचे महत्त्व आणि व्याप्ती समजावून दिली. सर्व विद्यार्थ्यांचे सादरीकरण व भाषेची जाण याचे कौतुक केले. त्यानंतर गणेश गावखडकर यांनी विद्यार्थ्यांना कवितेला चाल कशी लावावी, कवितेचा आनंद कसा घ्यावा, रसग्रहण कसे करावे याचे उदाहरणासहित मार्गदर्शन केले.
केवणी गावच्या सरपंच कीर्ती पाटील यांनी सर्व विद्यार्थी आणि कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. केवणी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी भूषण पाटील, सनातन पाटील, कांतीलाल पाटील, समाधान तुरे, प्रवीर भोईर याप्रसंगी उपस्थित होते. समाधान पुरे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले. नृत्य प्रशिक्षक पंकज पडाळे यांनी विद्यार्थ्यांना कलेचे महत्त्व सांगितले. संयोजिका डॉ. प्रतीक्षा बोर्डे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या उपक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका निलांबरे जठार यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

Post a Comment