बेलापूर विभागात विनापरवानगी शेड्स व बांधकामांवर तोडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने महानगरपालिका क्षेत्रातील विनापरवानगी होत असलेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे या विरोधात मागील आठवडयापासून धडाकेबाज कारवाई सुरु असून आजही महापालिका आयुक्त् यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त् डॉ. राहुल गेठे यांचा मार्गदर्शनाखाली बेलापूर विभागात अनधिकृतरित्या विनापरवानगी बांधलेल्या अतिक्रमण शेड व बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
बेलापूर विभाग कार्यालय क्षेत्रातील सेक्टर 15 बेलापूर येथील (1) महेश हॉटेल, (2) प्रणाम हॉटेल, (3) हॉटेल लक्ष्मी, (4) मालवणी कट्टा, (5) अश्विथ हॉटेल, (6) मॅकडॉनल्स, (7) कबाना बार, (8) द स्कॉड, (9) द चाप हाऊस, (10) पॅनेशिया, (11) एस स्पाईस हे व्यावसायिक आपल्या सामासिक जागेचा (मार्जिनल स्पेस) शेड टाकून व्यवसायासाठी वापर करीत होते. तसेच सनसिटी इमारतीसमोर विनापरवानगी पावसाळी शेड उभारण्यात आले होते.
या विनापरवानगी अनधिकृत बांधकामांस व वापरास बेलापूर विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 53 (1) व 55 अन्वये नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. तसेच सनसिटी इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या पावसाळी शेडला नोटीस बजावल्यानंतर संबधितांनी सदर अनधिकृत शेड स्वत:हून हटविणे आवश्यक होते.
तथापि याबाबत संबंधितानी नोटीशीची दखल न घेतल्यामुळे बेलापूर विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन अनधिकृत शेड / पावसाळी शेड निष्कासित करण्यात आलेल्या आहेत. या निष्कासनादरम्यान झालेला कारवाईपोटी दंडात्मक रु. 25 लक्ष इतकी वसुली करण्यात आलेली आहे.
अतिक्रमणय विभागाचे उपआयुक्त् डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनानुसार सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, श्री. शशिकांत तांडेल, श्री. संजय तायडे, श्री. सागर मोरे व श्री. प्रबोधन मवाडे यांच्या नियंत्रणाखाली तसेच प्रशासकीय अधिकारी श्री. रमेश राठोड, अधिक्षक श्री. जयंता नामदे, कनिष्ठ अभियंता श्री. स्वप्निल तारमळे यांच्या सहयोगाने अतिक्रमण विभागाकडील पोलीसांच्या मदतीने सदर अनधिकृत विनापरवानगी बांधलेले अतिक्रमण शेड, बांधकाम निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या धडक मोहिमेसाठी बेलापूर विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व 40 मजूर कार्यारत होते. यामध्ये 4 गॅस कटर , 01 इलेक्ट्रीक हॅमर, 03 जेसिबी व 01 पोकलेन यांचा वापर करण्यात आला.
यापुढील काळातही संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्व आठही विभाग कार्यालय परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाया तीव्रतेने राबविल्या जाणार आहेत.

Post a Comment